काही व्यक्ती पदांमुळे मोठ्या होत नाहीत; तर त्यांच्या स्वभावामुळे, लोकांशी असलेल्या नात्यामुळे आणि संघर्षामुळे समाजाच्या मनात घर करतात. केतन भाटीकर हे त्यापैकीच एक नाव होते.

फोंड्याच्या राजकीय संस्कृतीत काही नेते हे केवळ निवडणुकांपुरते मर्यादित राहत नाहीत; ते लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात, गावागावांत आपली माणसे निर्माण करतात आणि एका भावनिक नात्याने समाजाशी जोडले जातात. डॉ. केतन भाटीकर हे अशाच पिढीतील नेते होते. त्यामुळे त्यांचे जाणे हे केवळ एका पक्षाचे नुकसान नाही, तर फोंड्याच्या सार्वजनिक जीवनातील एक आवाज हरपल्याची अनेकांची भावना आहे. केतन भाटीकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वांत मोठी ताकद म्हणजे त्यांची स्पष्ट भूमिका होती. त्यांनी अनेकदा प्रस्थापित व्यवस्थेला थेट प्रश्न विचारले. कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा होती. फोंड्यातील स्थानिक प्रश्न असोत, युवकांचे मुद्दे असोत किंवा प्रशासनातील विसंगती यासंबंधी भाटीकर नेहमी आक्रमकपणे मांडणी करताना दिसत. त्यामुळे त्यांच्याकडे आशेने पाहणारा एक मोठा वर्ग निर्माण झाला होता. तडफदार, स्पष्टवक्ते आणि जनतेशी घट्ट नाळ असलेले केतन भाटीकर यांच्या दुर्दैवी निधनाने फोंड्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. संघर्षशील नेतृत्व, सामान्य कार्यकर्त्यांशी असलेली जवळीक आणि अन्यायाविरोधात आक्रमक भूमिका यामुळे भाटीकर यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. याच कारणास्तव सर्वच राजकीय पक्षांना त्यांच्याशी जवळीक असावी असे वाटायचे. त्यांचे दुर्दैवी निधन ही सर्वांसाठी धक्कादायक आणि दुःखद घटना ठरली. प्रवासात असताना गाडीतून उतरल्यावर खाली पडलेला मोबाईल उचलण्यासाठी ते वाकले आणि त्याच क्षणी त्यांना सर्पदंश झाला; ते सारे काही इतके अघटित आणि अनपेक्षित होते की त्यांना त्याचे गांभीर्य कळले नाही.
आजच्या काळात राजकारणात तत्त्वांपेक्षा व्यवस्थापनाला अधिक महत्त्व दिले जाते. अशा वेळी थेट बोलणारे, प्रसंगी वाद ओढवून घेणारे आणि लोकांमध्ये राहणारे नेते कमी होत चालले आहेत. केतन भाटीकर यांच्यात ही धाडसी वृत्ती होती. त्यामुळेच त्यांच्या निधनानंतर फोंड्यातील अनेक कार्यकर्त्यांनी एक लढवय्या आवाज हरपला, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. फोंड्याने अनेक चढउतार पाहिले. या भूमीने संघर्षशील नेतृत्व दिले, सामाजिक चळवळी उभ्या केल्या आणि राजकीयदृष्ट्या वेगळा ठसा उमटवला. त्यामुळे येथील प्रत्येक लोकप्रिय नेत्याच्या जाण्याने समाजात भावनिक पोकळी निर्माण होते. केतन भाटीकर यांच्या निधनानंतरही हाच सूर ऐकायला मिळत आहे. फोंड्याच्या सार्वजनिक जीवनात त्यांच्या आठवणी दीर्घकाळ जिवंत राहतील. काही व्यक्ती पदांमुळे मोठ्या होत नाहीत; तर त्यांच्या स्वभावामुळे, लोकांशी असलेल्या नात्यामुळे आणि संघर्षामुळे समाजाच्या मनात घर करतात. केतन भाटीकर हे त्यापैकीच एक नाव होते.
गोव्याच्या राजकारणात आणि विशेषतः फोंड्याच्या सामाजिक-राजकीय जीवनात गेल्या काही महिन्यांत एक विचित्र योगायोग चर्चेचा विषय ठरत आहे. अवघ्या १५ महिन्यांच्या कालावधीत फोंड्याने तीन प्रभावी नेते गमावले आणि विशेष म्हणजे तिघांचाही मृत्यू १५ तारखेलाच झाला. त्यामुळे फोंड्यात सध्या हळहळ, भावनिक चर्चा आणि नियतीच्या क्रूर खेळीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यापूर्वी लवू मामलेदार आणि रवी नाईक या दोन महत्त्वाच्या नेत्यांचे १५ तारखेलाच निधन झाले होते. त्यामुळे १५ ही तारीख फोंड्यासाठी अशुभ ठरत असल्याची चर्चा गावागावांत सुरू झाली आहे. अर्थात, अशा योगायोगांकडे अंधश्रद्धेच्या नजरेने पाहण्याचे कारण नाही; पण सतत घडणाऱ्या घटनांमुळे समाजात भावनिक प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. गोव्याच्या छोट्या राजकीय-सामाजिक वर्तुळात व्यक्तिगत नाती अधिक घट्ट असतात. त्यामुळे अशा घटनांचा परिणाम अधिक तीव्रतेने जाणवतो. योगायोग, नियती आणि काळ यांची चर्चा काही दिवस चालेल. १५ तारखेभोवती गूढतेचे वातावरणही निर्माण होईल. पण या चर्चेपलीकडे जाऊन फोंड्याने आपल्या नेतृत्व परंपरेचा विचार करण्याची गरज आहे. लोकांमध्ये राहणारे, प्रश्नांवर बोलणारे आणि संघर्ष करण्याची हिंमत असलेले नेतृत्व टिकवणे हीच केतन भाटीकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
अशा घटनांमुळे एक मोठा प्रश्न पुन्हा समोर येतो. गोव्यातील स्थानिक नेतृत्वाची नवी पिढी तयार होते आहे का? अनेक अनुभवी आणि जनाधार असलेले नेते एकामागून एक निघून जात असताना त्यांच्या जागी समाजाशी तितक्याच प्रामाणिकपणे जोडलेले नेतृत्व दिसत नाही. पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तिनिष्ठ राजकारण वाढल्याने कार्यकर्त्यांशी असलेली आत्मीयता कमी होत असल्याची खंतही व्यक्त केली जाते. अशावेळी केतन भाटीकर यांचे आकस्मिक निघून जाणे गोमंतकीयांसाठी अधिक दुःखदायक आहे.