लोकांनी मानवी म्हणून असलेले सर्व सुंदर गुण भविष्यात वापरण्यासाठी स्वतःमध्येच खोलवर दडवून ठेवले आहेत, कारण ते स्वर्गात जाणार आहेत आणि त्यांना तिथे प्रेमळ व आनंदी राहायचे आहे!

सद्गुरू : या पृथ्वीवरील मानवी जीवन रूपांतरित करणाऱ्या महान चळवळी, क्रांती आणि विलक्षण घटना या काही स्वर्गातून काहीतरी कोसळल्यामुळे घडून आलेल्या नाहीत. जेव्हा आवश्यक प्रमाणात लक्ष दिले गेले, तेव्हा काही मोजक्या लोकांनी केलेल्या छोट्या गोष्टी एका विलक्षण प्रक्रियेत फुलून आल्या.
जर तुम्ही एखाद्या गोष्टीकडे पुरेसे लक्ष दिले आणि त्यासाठी पुरेशी ऊर्जा दिली गेली, तर एका मानवाच्या हृदयात धडधडणारे - त्याचे विचार आणि भावना - संपूर्ण जगाला प्रेरित करू शकतात. उदाहरणार्थ, महात्मा गांधींनी आपली चळवळ काही मोजक्या लोकांच्या सहकार्याने सुरू केली. हेच थोडेफार लोक अल्पावधीत लाखो लोकांमध्ये परिवर्तित झाले आणि एक महान चळवळ बनली.
हे केवळ इतकेच आहे की, साधारणपणे बहुतेक लोकांकडे एखाद्या गोष्टीकडे सातत्याने लक्ष देण्याची तीव्रता नसते. ते अधूनमधून लक्ष देतात, त्यामुळे त्या गोष्टीला कधीच हवी तशी गती प्राप्त होत नाही.
बहुसंख्य मानव साधारण जीवन का जगतात याचे एक कारण म्हणजे ते प्रत्येक गोष्टीत ‘कंजूस’ असतात. ते मनमोकळे हसू शकत नाहीत किंवा स्वतःला पूर्णपणे व्यक्त करू शकत नाहीत. जेव्हा तुम्ही इतके कंजूस असता, तेव्हा जीवन देखील तुमच्यासोबत तितकेच कंजूस वागते.
तुम्हाला मर्यादित करणारी गोष्ट म्हणजे, तुम्हाला काहीतरी गिळंकृत करेल ही भीती नाही. ती गोष्ट म्हणजे हिशोब. कंजूस माणसाचा हिशोब अमर्याद असतो - तो सतत चालूच असतो. त्यांना एक फळ मिळाले, तर ते त्याचे लाखो तुकडे करून एखाद्याला एक तुकडा देऊ इच्छितात. एका फळाचे लाखो तुकडे करण्यासाठी त्यांचे अर्धे जीवन खर्ची पडू शकते. नेमके हेच घडत आहे. थोडेसे देण्यासाठी लोक स्वतःचे संपूर्ण जीवन घालवतात. हे जीवन एका विशिष्ट पूर्णत्वाने घडत असते. जो व्यक्ती पूर्णपणे देतो, तोच जीवनाला पूर्णत्वाने जाणू शकतो. इतरांना ते कधीच माहित होणार नाही.
जेव्हा लोकांना काहीतरी मिळवायचे असते, तेव्हा ते त्यांचे सर्व प्रकारचे तर्क सोडून देतात. पण जेव्हा त्यांना काहीतरी द्यायचे असते, तेव्हा ते अगदी तर्कसंगत बनतात! प्रत्येक गोष्टीबद्दलचा हा अतिरेकी हिशोब मानवांना - जे सुगंधी फुलांसारखे जगू शकले असते - काट्यांसारखे बनवतो. लोक मला नेहमी विचारतात: “आपण सर्वजण एकाच स्रोतापासून आलो आहोत. मग एखादा फुलून येतो आणि दुसरा फुलून येत नाही, असे का?” याचे कारण इतकेच आहे की, ते स्वतःला भविष्यासाठी राखून ठेवत आहेत. हे एखाद्या उदासिन कुत्र्यासारखे आहे, जो त्याला मिळालेली हाडे इथे-तिथे लपवतो आणि नंतर ती कुठे लपवली आहे तेच तो विसरतो. लोकांनी मानवी म्हणून असलेले सर्व सुंदर गुण भविष्यात वापरण्यासाठी स्वतःमध्येच खोलवर दडवून ठेवले आहेत, कारण ते स्वर्गात जाणार आहेत आणि त्यांना तिथे प्रेमळ व आनंदी राहायचे आहे!
जर तुम्ही एखादे जहाज बंदरात किंवा गोदीत ठेवले, तर ते खूप सुरक्षित राहते; पण दुर्दैवाने जहाज बंदरात ठेवण्यासाठी बनवलेले नसते. जहाज महासागरात प्रवास करण्यासाठी बनवलेले असते. जे लोक सतत सुरक्षित राहण्याचा आणि स्वतःला व स्वतःच्या सर्व गोष्टी भविष्यासाठी राखून ठेवण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांकडे वर्तमानच नसते, तर मग त्यांच्यासाठी भविष्य कसे असणार? जर तुम्ही वर्तमान गमावत असाल, तर भविष्य आले की तुम्ही ते गमावणार नाही असे तुम्हाला वाटते का?
गौतम बुद्धांबद्दल एक कथा आहे. ही काही खरी कथा नाही, पण एक कथा आहे. असे म्हणतात की, जेव्हा गौतम बुद्धांना निर्वाण प्राप्त झाले आणि ते अंतिम मुक्तीच्या दाराकडे जात होते, तेव्हा त्यांचा चेहरा त्या दाराकडे नव्हता, तर त्यांची पाठ त्या दाराकडे होती. तेव्हा त्यांना विचारले गेले, “गौतम, जीवनभर तुमच्यात हा एकच गुण होता. जगात प्रत्येकजण राजा बनण्याचा, पैसा कमावण्याचा आणि राजवाड्यात राहण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही याच्या उलट दिशेने गेलात - राजापासून भिकाऱ्यापर्यंत, राजवाड्यापासून अत्यंत दारिद्र्यापर्यंत. तिथे देखील तुम्ही उलट दिशेने गेला. आता काहीतरी करून तुम्ही यशस्वी झाला आहात, म्हणून आम्ही तुमच्यासाठी अंतिम मुक्तीचे द्वार उघडले आहे. मग तुम्ही त्याकडे पाठ का केली आहे?” गौतम म्हणाले, “माझा त्या दारातून प्रवेश करण्याचा कोणताही हेतू नाही, म्हणूनच मी दुसरीकडे पाहत आहे. मी फक्त इतरांना आधी जाऊ देत आहे. मला कोणतीही घाई नाही. मला वाटते की, इतरांच्या आधी पुढे जाणे हे माझ्या दृष्टीने थोडे अभिरुचीहीन आहे.”
लोक नेहमीच त्यांच्या मनाच्या आणि हृदयाच्या कंजूषपणापासून दूर जाण्यासाठी झटपट उपाय शोधत असतात. मागील चोवीस तासांत तुमच्यापैकी किती जणांनी एखाद्या व्यक्तीकडे किंवा एखाद्या गोष्टीकडे पाहून अशा प्रकारे हसले आहे की, त्यामुळे तुमच्या डोळ्यांत पाणी आले आहे? फक्त हसण्यासाठी तुम्ही इतके कंजूस का आहात? थोडेफार अश्रू ढाळले, तर तुम्ही काही सुकून जाणार नाही. समस्या हिशोबाची आहे.
जर तुम्ही इथे श्वास घेण्याच्या आणि जगण्याच्या प्रक्रियेत स्वतःला विलीन केले, तर तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी एक उपाय बनता. हिशोब करण्याने विलीन होता येत नाही. विलीन होणे देण्यातून घडते - ‘तुमच्या जीवनातला प्रत्येक क्षण देण्यातून’ ते घडते. केवळ देण्याची एक प्रक्रिया बनून ते घडते. जर ते नसेल, तर तुम्ही विलीन होत नाही. आणि जर तुम्ही विलीन झाला नाही, तर मग कोणताही उपाय नाही.
मला हवे आहे की, तुम्ही हे करून पाहावे : पुढील चोवीस तासांत, तुम्ही किमान एक तरी क्षण हा पूर्णपणे देण्याचा क्षण म्हणून अनुभवला पाहिजे. तुम्ही अशा प्रकारे दिले पाहिजे की, तुमच्यातील सर्व काही विलीन होऊन जाईल. चोवीस तासांत एक असा देण्याचा क्षण. तुम्ही हे करू शकता का?
- सद्गुरु
(ईशा फाऊंडेशन)