
आयपीएल २०२६ च्या प्लेऑफची शर्यत आता कमालीची रंजक झाली असून मागील हंगामातील उपविजेता पंजाब किंग्स संघ सध्या ‘व्हेंटिलेटर’वर आहे. पंजाब किंग्सचा प्लेऑफमधील प्रवेश आता केवळ स्वतःच्या कामगिरीवर अवलंबून नसून, त्यांचे भवितव्य इतर संघांच्या जय-पराजयाच्या गणितावर टिकून आहे.
सध्याच्या गुणतालिकेनुसार, गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांची बरोबरी करणे आता पंजाबला कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही. त्यामुळे पंजाब किंग्सचे ‘टॉप-२’ मध्ये फिनिश करून क्वालिफायर खेळण्याचे स्वप्न पूर्णपणे संपुष्टात आले आहे. आता त्यांच्यासमोर केवळ चौथ्या स्थानावरून प्लेऑफ गाठण्याचा एकमेव मार्ग शिल्लक आहे. पंजाब किंग्सला बाद फेरी गाठायची असेल, तर पुढील सर्व समीकरणे तंतोतंत जुळून येणे अत्यंत आवश्यक आहे. पंजाबला आपला साखळी फेरीतील शेवटचा सामना केवळ जिंकून चालणार नाही, तर तो अत्यंत मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. सनरायझर्स हैदराबाद संघ सध्या चांगल्या स्थितीत आहे. पंजाबच्या पात्रतेसाठी हैदराबादने त्यांचे उर्वरित दोन्ही सामने गमावणे अनिवार्य आहे. गुणतालिकेत वरच्या स्थानासाठी स्पर्धा करणारे चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ १४ गुणांच्या पुढे जाता कामा नयेत, अशी प्रार्थना पंजाबला करावी लागेल. जर वरील सर्व गोष्टी पंजाबच्या अनुकूल घडल्या, तरीही अखेरचा निकाल ‘नेट रन रेट’वर लागणार आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यातील मोठ्या विजयाच्या जोरावर पंजाबला आपला रन रेट इतर प्रतिस्पर्धी संघांपेक्षा सरस ठेवावा लागेल.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्सने या हंगामाची सुरुवात अत्यंत शानदार केली होती. सुरुवातीला सलग सहा सामने जिंकून त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले होते. मात्र, त्यानंतर संघाची लय पूर्णपणे बिघडली. पंजाबला लागोपाठ सहा सामन्यांमध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या खराब कामगिरीमुळे संघ थेट प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे.
पंजाब किंग्सचे आव्हान तांत्रिकदृष्ट्या अजूनही जिवंत आहे. परंतु, त्यांचा प्लेऑफचा मार्ग स्वतःच्या मोठ्या विजयापेक्षा 'इतरांच्या पराभवावर' अधिक अवलंबून आहे. आता शेवटच्या सामन्यात पंजाब नशिबाची साथ मिळवून चमत्कार घडवतो का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
लीग टप्प्यात आता पंजाब किंग्सचा फक्त एकच सामना शिल्लक आहे. १३ सामन्यांनंतर पंजाबच्या खात्यात केवळ १३ गुण आहेत. पंजाबने आपला शेवटचा सामना लखनौविरुद्ध जिंकला, तरी ते जास्तीत जास्त १५ गुणांपर्यंतच पोहोचू शकतात. याउलट, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांसारखे संघ १६ गुणांपर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पंजाबला लखनौविरुद्ध विजय मिळवण्यासोबतच इतर संघांच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागणार आहे. धरमशाला येथे खेळवण्यात आलेल्या अटीतटीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्सवर २३ धावांनी मात केली. या दिमाखदार विजयासह आरसीबी चालू हंगामात प्लेऑफ गाठणारा पहिला संघ ठरला आहे.
- प्रवीण साठे