मल्टिटेक स्ट्रायकर्स ‘भाटले प्रीमियर लीग’चा मानकरी

अटीतटीच्या अंतिम सामन्यात श्यामल स्मॅशर्स पराभूत

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
9 hours ago
मल्टिटेक स्ट्रायकर्स ‘भाटले प्रीमियर लीग’चा मानकरी

भाटले प्रीमियर लीग २.० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेला एम. एस. मल्टिटेक स्ट्रायकर्स संघ.

पणजी : भाटले स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘भाटले प्रीमियर लीग २.०’ (बीपीएल) क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद एम. एस. मल्टिटेक स्ट्रायकर्स संघाने पटकावले आहे. पणजी येथील आल्तिनो पोलीस रिझर्व्ह मैदानावर १६ आणि १७ मे या कालावधीत ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. अंतिम सामन्यात मल्टिटेक स्ट्रायकर्सने श्यामल स्मॅशर्सचा पराभव करत मानाचा चषक आपल्या नावावर केला.
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून एम. एस. मल्टिटेक स्ट्रायकर्स संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारित ५ षटकांमध्ये मल्टिटेकने ४४ धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये यश मणेरकर याने २२ धावांची महत्त्वपूर्ण आणि खेळी केली.
४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्यामल स्मॅशर्स संघाला मल्टिटेकच्या अचूक गोलंदाजीचा सामना करावा लागला. मल्टिटेकच्या विशाल शिरोडकर, हरेश परसेकर आणि साईश नाईक यांनी भेदक मारा करत श्यामल स्मॅशर्सला ५ षटकांत अवघ्या ३४ धावांवर रोखले आणि आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
नीलेश नाईक यांच्या मालकीखालील एम. एस. मल्टिटेक स्ट्रायकर्स संघाने या स्पर्धेत सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले होते. संघाने ६ लीग सामन्यांपैकी ५ सामने जिंकून दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली होती आणि अंतिम सामन्यातही तोच फॉर्म कायम राखला.
या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते. भाटले-पणजी येथील सर्व स्थानिक रहिवाशांनी या लीगमध्ये खेळाडू आणि प्रेक्षक म्हणून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना भव्य चषक आणि आकर्षक रोख बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.
वैयक्तिक पुरस्कारांवर ‘मल्टिटेक’ची मोहर
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यामध्ये मल्टिटेक संघातील खेळाडूंनी बाजी मारली. स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाजीबद्दल सायेश नाईक याला ‘सर्वोत्कृष्ट फलंदाज’ पुरस्काराने गौरविण्यात आले, तर आर्यन नाईक याने ‘सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक’ पुरस्कार पटकावला.