बांदोडकर लीग टी-२० : साळगावकर क्रिकेट क्लब उपविजेता, वीर यादवची वादळी खेळी

बांदोडकर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर मुख्य चषकासह जेनो स्पोर्ट्स क्लबचा संघ. सोबत इतर.
पणजी : पणजी जिमखाना आयोजित बांदोडकर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गतविजेत्या जेनो स्पोर्ट्स क्लबने साळगावकर क्रिकेट क्लबवर ३ गडी राखून एका थरारक आणि अविस्मरणीय विजयाची नोंद केली. सोमवारी पणजी जिमखाना मैदानावर झालेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात दोन्ही अपराजित संघ आमनेसामने होते. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात जेनोने बाजी मारत मुख्य चषकावर पुन्हा एकदा आपले नाव कोरले.
अंतिम सामन्यात साळगावकर क्रिकेट क्लबने ठेवलेले २१७ धावांचे डोंगराएवढे आव्हान पार करताना जेनो स्पोर्ट्सची सुरुवात डळमळीत झाली होती. मात्र, जेनोचा तरुण सलामीवीर वीर यादव हा या विजयाचा खरा शिल्पकार ठरला. त्याने अवघ्या ४१ चेंडूंत ८९ धावांची वादळी खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने ६ चौकार आणि ८ षटकार ठोकले.
एका बाजूने विकेट्स पडत असताना वीरने कौशल हाट्टंगडी (३३ धावा, १९ चेंडू) याच्यासोबत चौथ्या विकेटसाठी अवघ्या ४० चेंडूंत ८३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली आणि जेनोला सामन्यात जिवंत ठेवले.
सामना शेवटच्या षटकात आला तेव्हा जेनोला विजयासाठी २ चेंडूंत ४ धावांची गरज होती. या अत्यंत दबावाच्या क्षणी निहाल सुर्लकरने ऋत्विक नाईकच्या (३/५२) चेंडूवर सरळ षटकार ठोकून जेनो स्पोर्ट्स क्लबला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. निहालने अवघ्या १५ चेंडूंत ३ षटकार आणि १ चौकारासह नाबाद ३३ धावांची मॅच-विनिंग खेळी केली.
मध्यंतरी समर दुभाषी (२४ धावा) आणि निहाल यांच्यात ७ व्या विकेटसाठी झालेली ४३ धावांची भागीदारीही जेनोसाठी निर्णायक ठरली. साळगावकर संघाने महत्त्वाच्या क्षणी विकेट्स घेतल्या, मात्र काही सोपे झेल सुटल्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
साळगावकर क्रिकेट क्लबची दमदार फलंदाजी
यापूर्वी, जेनोने नाणेफेक जिंकून साळगावकर क्रिकेट क्लबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. साळगावकर संघाने निर्धारित २० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात २१७ धावांचा विशाल धावसंख्या उभारली होती. यामध्ये शंतनू नेवगी (६८ धावा, ४३ चेंडू), पियुष यादव (५७ धावा, ३४ चेंडू) आणि आयुष्य वेर्लेकर (नाबाद ४८ धावा, १५ चेंडू) यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. जेनोतर्फे विकास सिंग आणि पुंडलिक नाईक यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
सामन्यानंतर झालेल्या मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला जेनो फार्मास्युटिकल्सचे चेअरमन दिलीप साळगावकर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच, दिवंगत भाऊसाहेब बांदोडकर यांच्या परिवारातील सदस्य, प्रायोजक डी. बी. बांदोडकर अँड सन्सचे संचालक समीर काकोडकर, योगेश वेंगुर्लेकर आणि पणजी जिमखानाचे सचिव राजेश खंवटे आदी मान्यवर उपस्थित होते. विजेत्या जेनो स्पोर्ट्स क्लबला ७५ हजार रुपये रोख आणि चषक, तर उपविजेत्या साळगावकर क्रिकेट क्लबला ४० हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कार
प्लेअर ऑफ द फायनल : वीर यादव (जेनो स्पोर्ट्स क्लब)
उत्कृष्ट फलंदाज : शंतनू नेवगी (साळगावकर क्रिकेट क्लब)
उत्कृष्ट गोलंदाज : पुंडलिक नाईक (जेनो स्पोर्ट्स क्लब)
मॅन ऑफ द टूर्नामेंट : योगेश कौठणकर