मध्य प्रदेशचा इश्मीत अरोरा मुलांच्या गटात चॅम्पियन

राष्ट्रीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेतील मुख्य चषकासह विजेत्या खेळाडूंसोबत मान्यवर.
......
पणजी : गोवा बॅडमिंटन असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित योनेक्स-सनराईज अंडर-१३ राष्ट्रीय मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत तेलंगणाच्या शन्वी रेड्डी निम्माने दुहेरी विजेतेपद पटकावत स्पर्धेची स्टार खेळाडू ठरली. सोमवारी नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये देशभरातील युवा खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
मध्य प्रदेशच्या इशमीत अरोराने मुलांच्या एकेरी गटात शानदार कामगिरी करत विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात त्याने उत्तराखंडच्या सार्थक जोशीवर २२-२०, ८-२१, २१-१९ अशा चुरशीच्या लढतीत मात केली. तीन गेमपर्यंत रंगलेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंमध्ये जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला.
मुलांच्या दुहेरीत हर्षित-हितेन जोडी अव्वल
मुलांच्या दुहेरी अंतिम सामन्यात आंध्र प्रदेशच्या हर्षित वेंकट साई आणि दिल्लीच्या हितेन या जोडीने तामिळनाडूच्या अमितेशा ए.के. आणि अथविक जे.सी. जोडीवर २१-१८, १४-२१, २१-१४ असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले.
उपांत्य फेरीत शन्वी रेड्डी निम्माने कर्नाटकच्या स्तुती एस. शेट्टीवर २१-११, २१-५ असा विजय मिळवला होता. दुसऱ्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राच्या दिविषा सिंगने कर्नाटकच्या श्रेया ए. राववर २१-१९, २१-१५ अशी मात केली. मुलांच्या एकेरीत सार्थक जोशीने दिल्लीच्या अर्पित बलियानचा २१-११, २१-११ असा पराभव केला, तर इशमीत अरोराने पंजाबच्या रॅबिग्युएल अंजीवर २४-२२, १९-२१, २१-१३ असा विजय मिळवला.
गोव्याच्या अमायरा धुमटकरचा विशेष गौरव
'मॉडेल मडगाव' पुरस्कृत या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय स्पर्धेत एकूण ६ लाख रुपयांचे बक्षीस वितरण करण्यात आले. गोव्याची उदयोन्मुख आणि आश्वासक बॅडमिंटनपटू अमायरा धुमटकर हिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत तिला स्पर्धेत ‘विशेष पुरस्काराने’ गौरविण्यात आले.
शन्वी रेड्डी निम्माची दुहेरी कामगिरी
मुलींच्या एकेरी अंतिम सामन्यात तेलंगणाच्या शन्वी रेड्डी निम्माने महाराष्ट्राच्या दिविषा सिंगवर २१-९, २१-१९ असा सरळ गेममध्ये विजय मिळवत विजेतेपद पटकावले. यानंतर शन्वीने ल्योशा कोरुकोंडा हिच्यासह मुलींच्या दुहेरीतही विजेतेपद मिळवले. या जोडीने कर्नाटकच्या शान्वी पी. एन. आणि शांभवी शर्मा यांच्यावर २१-१९, २१-१८ असा विजय मिळवला.