२५ मे पासून राज्यभर सदस्यत्व नोंदणी मोहीम : त्यानंतर नव्या समित्यांची स्थापना

मडगाव : गोवा फॉरवर्डकडून (Goa Forward) सर्व गट समिती व क्रीडा सांस्कृतिक समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. २५ मे पासून राज्यभरात सदस्यत्व नोंदणी मोहीम राबविण्यात येईल त्यानंतर नव्या समित्या स्थापन होतील. निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली असून युतीच्या चर्चेसाठी शेवटच्या क्षणापर्यंत न राहता पूर्ण क्षमतेने निवडणुका लढविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, अशी माहिती गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर (Mohandas Lolienkar) यांनी दिली.
गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कार्यकारी समितीची बैठक सोमवारी फातोर्डा येथील ‘गोंयकार घर’ येथे आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यानंतर माहिती देताना लोलयेकर यांनी पक्षाकडून राज्यभरात २५ मे पासून सदस्यत्व नोंदणी मोहीम राबविण्यात येईल, असे स्पष्ट केले. यावेळी उपाध्यक्ष दुर्गादास कामत, दीपक कळंगुटकर, प्रशांत नाईक, राजेश कळंगुटकर, विकास भगत आदी उपस्थित होते.
लोलयेकर यांनी सांगितले की, हे वर्ष निवडणुकांचे वर्ष असल्याने व गोवा फॉरवर्ड हा प्रादेशिक पक्ष असल्याने पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सदस्य संख्या वाढविण्याची गरज लक्षात घेऊन सदस्यत्व नोंदणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. ही मोहीम राज्यभरात होणार असली, तरीही पहिल्या टप्प्यात ठराविक मतदारसंघात लक्ष केंद्रित केले जाईल.
राज्याबाहेरील अनेक मोठे पक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात येतात व मतांची विभागणी होते. या परिस्थितीत प्रादेशिक पक्ष कसा तग धरणार यावर चर्चा करण्यात आली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीच्या चर्चा होत असतात. मात्र मागील अनुभवावरून शेवटच्या क्षणापर्यंत केवळ चर्चाच सुरू राहतात. यावेळी असे होऊ नये यासाठी गोवा फॉरवर्ड पक्षाने पूर्ण क्षमतेने निवडणुकांना सामोरे जाण्याचे ठरविले आहे, असे लोलयेकर यांनी सांगितले. काँग्रेस व गोवा फॉरवर्ड यांची युती असून त्यानुसारच निवडणुकांबाबतच्या चर्चा पुढे नेल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुर्गादास कामत (Durgadas Kamat) यांनी सांगितले की, पक्षाच्या सर्व गट समित्या व सांस्कृतिक, क्रीडा, मच्छिमार सेल बरखास्त करण्यात आले आहेत. सदस्यत्व नोंदणी मोहिमेनंतर नव्या युवकांना संधी देण्याची संकल्पना अध्यक्ष सरदेसाई यांनी मांडली आहे. त्यानुसार सर्वांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला आहे. १२ मतदारसंघातील इन्चार्ज आपापल्या मतदारसंघात फिरवून परिस्थिती समजून घेऊन गट समित्या स्थापनेबाबत अहवाल देतील. त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येतील.