स्वप्नेश शेर्लेकर यांच्यावर कारवाईसाठी भाजप कार्यकर्त्यांची पोलीस ठाण्यात धडक

मुख्यमंत्री, भाजपविरोधात अपशब्द वापरल्याचा निषेध

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th May, 10:18 pm
स्वप्नेश शेर्लेकर यांच्यावर कारवाईसाठी भाजप कार्यकर्त्यांची पोलीस ठाण्यात धडक

डिचोली : सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी कारापूर येथील मेगा प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच भाजपविरोधात आक्षेपार्ह आणि अपशब्द वापरल्याचा आरोप करत डिचोली, साखळी आणि मये मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी डिचोली पोलिस ठाण्यावर धडक देत तातडीने कारवाईची मागणी केली.
सायंकाळी शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी डिचोली पोलीस ठाण्यासमोर एकत्र येत पोलीस निरीक्षक विजय राणे यांना निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे स्वप्निल शेर्लेकर यांच्याविरोधात त्वरित गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
या मोर्चात भाजप मंडळ अध्यक्ष रमा नाईक, डिचोली मंडळ अध्यक्ष डॉ. कौस्तुभ पाटणेकर, उत्तर गोवा भाजप अध्यक्ष दया कार्बोटकर, जिल्हा सदस्य महेश सावंत, पद्माकर मळीक, गोपाळ सुर्लीकर, संतोष नाईक, विश्वास चोडणकर, कृष्णा गावस, संजय नाईक आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरणे, सामाजिक सलोखा बिघडवणारी वक्तव्ये करणे तसेच भाजप कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरणे, या प्रकारामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाल्याचे नेत्यांनी यावेळी सांगितले.
शेर्लेकर यांनी सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपली भूमिका मांडावी आणि आंदोलन करावे; मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपची संघटना यांच्याविरोधातील अपशब्द सहन केले जाणार नाहीत, अशी भूमिका रमा नाईक, डॉ. कौस्तुभ पाटणेकर, गोपाळ सुर्लीकर, संतोष नाईक आणि विश्वास चोडणकर यांनी मांडली.
अन्यथा आंदोलन
या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्यास पुढील आंदोलनात्मक भूमिका निश्चित करण्यात येईल, असा इशाराही भाजप कार्यकर्त्यांनी दिला. पोलिस निरीक्षक विजय राणे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून प्रकरणाची योग्य चौकशी करण्यात येईल व आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी तिन्ही मतदारसंघांच्या वतीने स्वतंत्र निवेदनेही सादर करण्यात आली.

हेही वाचा