प्रासा चॅलेंजर्सवर मात : पहिल्याच हंगामात ठरले अजिंक्य

पणजी : काम्पाल येथील इनडोअर स्टेडियमवर झालेल्या बॅडमिंटन प्रो लीग (बीपीएल) २०२६ एडिशन २.० च्या अत्यंत चुरशीच्या अंतिम फेरीत नवख्या ‘धेंपो चॅलेंजर्स’ने ‘प्रासा चॅलेंजर्स’चा १२०-१०४ असा पराभव करत विजेतेपदावर मोहोर उमटवली. गोव्याच्या बॅडमिंटन लीगमध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेल्या या संघाने संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहत हे यश मिळवले.
साखळी फेरीत धेंपो चॅलेंजर्सने पाचपैकी पाच सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले होते. त्यांच्या पाठोपाठ प्रासा चॅलेंजर्सचा संघ होता, तर साळकर स्मॅशर्स आणि टॅक्स ग्लॅडिएटर्स यांच्यात तिसऱ्या स्थानासाठी लढत झाली. या स्पर्धेत एकूण सहा कॉर्पोरेट संघांनी ‘राऊंड रॉबिन लीग’ स्वरूपात सहभाग घेतला होता. यातील अव्वल दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आणि तिसऱ्या व चौथ्या स्थानावरील संघांमध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी लढत झाली.
सात पुरुष दुहेरी आणि एक मिश्र दुहेरी सामना अशा अनोख्या ‘रिले’ स्वरूपात खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी केली. यामध्ये १२० गुणांपर्यंत प्रथम पोहोचणारा संघ विजयी घोषित केला जातो. सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर, अनिर्बान सेन / समीर सांगोडकर, मुकेश गावस / रुशीन जोशी आणि अर्जुन फळारी (कर्णधार) / सोहम नाईक यांच्या महत्त्वपूर्ण कामगिरीच्या जोरावर धेंपो चॅलेंजर्सने दमदार पुनरागमन केले आणि प्रासा चॅलेंजर्सवर १२०-१०४ अशा फरकाने विजेतेपद निश्चित केले.
रुशीन जोशी आणि मुकेश गावस यांना अंतिम फेरीची ‘इम्पॅक्ट पेअर’ म्हणून घोषित करण्यात आले, तर कपिल कानजी आणि विल्सन डिसोझा यांना तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यातील ‘इम्पॅक्ट पेअर’ म्हणून गौरवण्यात आले. सोहम नाईकने ‘एमव्हीपी पुरुष’, मलायका लोबोने ‘एमव्हीपी महिला’ आणि सुधन्वा उडुपाने ‘एमव्हीपी ज्युनियर्स’ पुरस्कार पटकावला.
विजेत्या धेंपो चॅलेंजर्स संघाला २,००,००० रुपयांचे रोख पारितोषिक आणि चषक मिळाला. उपविजेत्या प्रासा चॅलेंजर्सला १,४५,००० रुपये तर तिसऱ्या स्थानावरील टॅक्स ग्लॅडिएटर्सला १,१५,००० रुपये देण्यात आले. एमव्हीपी विजेत्यांना वैयक्तिक २,००० रुपयांचे बक्षीस आणि ‘फास्ट अँड अप’ प्रायोजित प्लांट प्रोटीन देण्यात आले.
या अंतिम सामन्याला पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्यासह क्रिकेटपटू शिखा पांडे, गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष मनोज पाटील, सचिव प्रवीण शेणॉय, खजिनदार संजय भोबे, बीपीएलचे संस्थापक नवनीत नस्नोडकर, सह-भागीदार उपेंद्र पै रायकर, तसेच क्लिंट फर्नांडिस आणि तेजवंत सिंग यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.