पंजाबचा सहा गडी राखून पराभव : फरेरा-दुबेची निर्णायक भागीदारी

चंदीगड : आयपीएल २०२६ च्या हंगामात आतापर्यंत अपराजित राहिलेल्या पंजाब किंग्सला अखेर पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. मंगळवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाबवर ६ गडी राखून विजय मिळवला. २२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने १९.२ षटकांतच लक्ष्य गाठून विजयावर शिक्कामोर्तब केले.
राजस्थानची वादळी सुरुवात
२२३ धावांचे कठीण लक्ष्य समोर असताना राजस्थान रॉयल्सने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. सलामीवीर वैभव सूर्यवंशीने अवघ्या १६ चेंडूंत ४३ धावा कुटून राजस्थानला पॉवरप्लेमध्येच ८४ धावांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर फॉर्मात असलेल्या यशस्वी जयस्वालने २७ चेंडूंत ५१ धावांचे अर्धशतक झळकावून विजयाचा पाया भक्कम केला.
फरेरा-दुबेची शानदार फलंदाजी
मधल्या फळीत डोनोवन फरेरा आणि शुभम दुबे यांनी शानदार फलंदाजी केली. फरेराने ५२ धावांची नाबाद खेळी केली, तर त्याला शुभम दुबेने ३१ धावा करून चांगली साथ दिली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी अवघ्या ३२ चेंडूंत ७७ धावांची अभेद्य भागीदारी रचली आणि राजस्थानला विजय मिळवून दिला.
न्यू चंदीगड येथील महाराजा यादवेंद्र सिंह स्टेडियमवर राजस्थानचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून पंजाबला फलंदाजीसाठी भाग पाडले. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने २० षटकांत ४ बाद २२२ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. पंजाबसाठी पहिल्या ५ फलंदाजांनी अप्रतिम बॅटिंग केली. प्रियांश आर्याने ११ चेंडूत २९ धावा केल्या. प्रियांशने या दरम्यान १ षटकार आणि ५ चौकार लगावले. कूपर कोनोली आणि कर्णधार श्रेयस अय्यर या दोघांनी प्रत्येकी ३०-३० धावा केल्या.
सलामीवीर प्रभसिमरनची फटकेबाजी
सलामीवीर प्रभसिमरनने ४४ चेंडूत ५९ धावा केल्या. यात त्याने ६ चौकार आणि १ षटकार लगावला. मार्कस स्टॉयनिसने ६२ धावांची फटकेबाजी केली. तर कर्णधार श्रेयस अय्यरने ३० धावांचे योगदान दिले. स्टॉयनिसने अखेरच्या क्षणी सूर्यांश शेडगे सोबत शेवटच्या १२ चेंडूत ४१ धावांची भागीदारी केली. स्टॉयनिसने शेवटच्या चेंडूत २४ धावा चोपल्या. त्यामुळे पंजाबला २०० पार पोहचता आले.
स्टॉयनिसचे वेगवान अर्धशतक
स्टॉयनिसने त्याच्या कारकीर्दीतील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. स्टॉयनिसने २० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. स्टॉयनिसने २२ चेंडूत ६ षटकार आणि ४ चौकारासह नाबाद ६२ धावा केल्या. तर सूर्यांश शेडगेने ३ धावा जोडल्या. तर राजस्थानसाठी यश राज पुंजाने २ विकेट्स मिळवल्या. तर जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर या दोघांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली.
राजस्थानसाठी सर्वाधिक ५०+ धावा करणारे खेळाडू
जॉस बटलर: २५ वेळा (८२ डाव)
संजू सॅमसन: २५ वेळा (१४४ डाव)
यशस्वी जयस्वाल: २० वेळा (७५ डाव)*
अजिंक्य रहाणे: १९ वेळा (९३ डाव)
शेन वॉटसन: १६ वेळा (७६ डाव)
पंजाबसाठी सर्वाधिक ५०+ धावा करणारे खेळाडू
के.एल. राहुल : २५ वेळा (५५ डाव)
शॉन मार्श : २१ वेळा (६९ डाव)
प्रभसिमरन सिंग : १२ वेळा (५८ डाव)*
ख्रिस गेल : ११ वेळा (४१ डाव)