इतिहासतज्ज्ञ करणार अभ्यास : तक्रारी, दाव्यांवरून वाढला वाद

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : जुने गोवे येथील ऐतिहासिक खांबाच्या नावावरून वाद सुरू झाल्याने याविषयी अभ्यास करण्याचा पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याचा प्रस्ताव आहे. इतिहासाचे अभ्यासक आणि तज्ज्ञ याविषयी सखोल अभ्यास करतील. सरकारने मान्यता दिल्यानंतर पुढील प्रक्रिया होणार आहे, अशी माहिती पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याच्या सूत्रांकडून मिळाली.
जुने गोवे येथील खांबाला ऐतिहासिक महत्त्व असून संरक्षित स्थळ म्हणून ते अधिसूचित होणार आहे. या खांबाचे नाव हातकातरो खांब असे नाही. हातकातरो असा उल्लेख करून त्याची बदनामी केली जात आहे, असा दावा आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी केला आहे. खांब परिसरातील उत्खनन करून सत्य शोधण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. त्यामुळे गोव्यात एक नावा वाद सुरू झाला आहे. संरक्षित स्थळ जाहीर करून नाव दिले तर वाद वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे हातकातरो खांबाचे नाव आणि इतिहासाविषयी अभ्यास करण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर इतिहास अभ्यासक व इतिहास संशोधकांची नावे आणि अहवाल सादर करण्याविषयीचा कार्यकाळ निश्चित केला जाईल.
हातकातरो खांब हा पूूर्वी जुने गोवे येथे सध्या गांधी चौक आहे, त्या जागी होता. पोर्तुगीज राजवटीतूनच तो तेथून सध्या आहे, त्या जागी नेण्यात आला. इतिहासात तशी नोंद आहे, अशी माहिती पुराभिलेख खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. नावाविषयी निर्णय घेण्यासाठी उत्खननाची गरज पडणार नाही. ऐतिहासिक नोंदी तसेच दस्तावेजाच्या आधाराने निर्णय घ्यावा लागेल. यासाठी इतिहासाची पुस्तके, दस्तावेज यांचा शोध घेऊन अभ्यास करावा लागेल. त्यासाठी पोर्तुगीज भाषेची जाण असलेल्या लोकांची मदत घेतली जाईल. या सर्व गोष्टींचा विचार करून प्रस्ताव तयार केला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
एक वर्षापूर्वी गौतम खट्टर याने हातकातरो खांबाचा विषय घेऊन सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा उल्लेख व्हिडीओत केला होता. याविषयी अॅड. कार्लुस फेरेरा यांनी तक्रार केल्यानंतर हातकातरो खांबाच्या नावाविषयी वाद निर्माण झाला.
प्रत्येक गोष्टीचे पुरावे, नोंदी असणे शक्य नाही : प्रा. प्रजल साखरदांडे
ज्या खांबाविषयी वाद सुरू आहे, त्याचे नाव ‘पेलोरिन्हो नोवो’ असे आहे. या खांबाखाली असलेल्या दगडावर तसे नाव आहे. मात या खांबाजवळ शिक्षेसाठी हात कापले जात होते. हे ऐतिहासिक सत्य आहे. त्यामुळे लोक या खांबाला ‘हातकातरो खांब’ म्हणत होते. ‘पेलोरिन्हो नोवो’ (नवो खांब) असे नाव देण्याला हरकत नाही; मात्र ‘हातकातरो खांब’ असा उल्लेख कंसात करावा लागेल, असे मत इतिहासतज्ज्ञ प्रा. प्रजल साखरदांडे यांनी व्यक्त केले.
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद बांदोडकर यांना ‘भाऊ’ वा ‘भाऊसाहेब’ म्हणूनच ओळखत होते. हातकातरो खांबाविषयीही तसेच आहे. आताप्रमाणे नोंदी वा रेकॉर्ड ठेवण्याची पद्धत शेकडो वर्षांपूर्वी नव्हती. काही जुन्या लोकांची जन्म तारखेची नोंदही असत नाही. इन्क्विझिशनच्या वेळीही या खांबाचा वापर झाला. लोकांना कळण्यासाठी ‘हातकातरो’ असे कंसात तरी उल्लेख झाला पाहिजे. क्षुल्लक गोष्टीवरून वाद निर्माण करणे योग्य नाही, असेही प्रा. प्रजल साखरदांडे म्हणाले.
अभ्यास वा संशोधन होणे योग्य ठरेल : प्रा. सुभाष वेलिंगकर
पोर्तुगीज राजवट ही जुलमी होती. त्याविरोधात लढा दिल्यानंतर गोव्याला मुक्ती मिळाली. जुने गोवे येथील खांबाच्या नावाबरोबरच त्याच्याशी संबंधित घटनांविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा आहेत. यावर अभ्यास वा संशोधन होणे योग्य होईल. पोर्तुगीज राजवट, त्यांच्या काळातील घटना यांचे उदात्तीकरण होऊ नये, असे मत प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी व्यक्त केले.