गौतम खट्टरनेच भाषण लिहिल्याचे स्पष्ट झाल्याने माधव खट्टरला जामीन

वास्को प्रथमवर्ग न्यायालयाकडून विविध अटींवर सुटका


28th April, 11:41 pm
गौतम खट्टरनेच भाषण लिहिल्याचे स्पष्ट झाल्याने माधव खट्टरला जामीन

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषण गौतम खट्टरनेच लिहिले आहे, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे, असे निरीक्षण नोंदवून या प्रकरणातील संशयित माधव खट्टर याला १० हजार रुपये व इतर अटींवर न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. याबाबतचा आदेश वास्को येथील प्रथमवर्ग न्यायालयाचे न्या. पूजा देसाई यांनी दिला.
गौतम खट्टर याने १८ एप्रिल रोजी वास्को येथे परशुराम जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सेंट झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. याचे तीव्र पडसाद उमटले होते. ख्रिस्ती बांधवांनी या विधानाचा निषेध करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. वास्को पोलिसांनी खट्टरविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सरकारने हे प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग केले आहे. गुन्हा शाखेने आयोजकांचा जबाब नोंदवला होता. गौतम खट्टरच्या उपस्थितीबाबत समन्वय आणि लॉजिस्टिक व्यवस्था करण्यासाठी त्याचा भाऊ माधवशी चर्चा झाली होती. माधवने विमान तिकीट, राहण्याची व्यवस्था आणि ५१,००० रुपये या अटींवर गौतमची उपस्थिती निश्चित केली होती, अशी माहिती आयोजकांनी जबाबात दिली होती. त्यामुळे माधव खट्टरला गुन्ह्यात सहसंशयित करण्यात आले होते. माधवला हरिद्वार येथून गोव्यात आणून अटक केली होती. वास्को येथील प्रथमवर्ग न्यायालयाने त्याला प्रथम चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविले होते.
माधवने जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर मंगळवार, २८ रोजी सुनावणी झाली. माधव खट्टरतर्फे अ‍ॅड. अमेय प्रभुदेसाई यांनी बाजू मांडली. त्यात त्यांनी माधवचा सहभाग नसताना त्याला या प्रकरणात सहसंशयित केल्याचा दावा केला. याच दरम्यान पोलिसांनी ‘वादग्रस्त भाषण माधवने लिहून दिले नाही, तर गौतम खट्टरने स्वतःच लिहिले आणि त्यावर तो स्वतःच व्यक्त झाला’, अशी माहिती न्यायालयात दिली. याची दखल घेऊन न्यायालयाने माधवला १० हजार रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला.
कायद्याच्या प्रक्रियेचे उल्लंघन करून माधवला अटक : अॅड. प्रभुदेसाई
सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलताना अॅड. अमेय प्रभुदेसाई म्हणाले, ज्या गुन्ह्यात सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे, अशा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या अर्नेश कुमार आणि सत्येंद्र कुमार अंतिल यांसारख्या निकालांनुसार अटकेपूर्वी नोटीस देणे अनिवार्य आहे. मात्र, या प्रकरणात कायद्याच्या प्रक्रियेचे उल्लंघन करून १८ वर्षांच्या तरुणाला थेट अटक करण्यात आली, जी अनावश्यक होती व टाळता आली असती.
अटकेमुळे दोन विषयांच्या परीक्षांना गैरहजर
माधव खट्टर कायदा विषयाच्या पहिल्या वर्गात शिकत आहे. त्याची सोमवारपासून परीक्षा सुरू झाली. अटक झाल्यामुळे त्याला पहिल्या वर्षाच्या दोन विषयांच्या अंतिम परीक्षेपासून वंचित राहावे लागले, अशी माहिती समोर आली आहे.