जमीन रूपांतरणाचा घोटाळा उघड करणार : व्हेंझी

युरींनंतर व्हेंझी व्हिएगस यांची पणजी पोलिसांत हजेरी


28th April, 11:50 pm
जमीन रूपांतरणाचा घोटाळा उघड करणार : व्हेंझी

पणजी पोलीस स्थानकाबाहेर पत्रकारांशी बोलताना आमदार व्हेंझी व्हिएगस. सोबत इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : जमीन रूपांतरणाचा घोटाळा हा कृषी, महसूल व नगर नियोजन या तीन खात्यांशी संबंधित आहे. शेतजमीन ही नापीक (नॉन कल्टीवेबल) जमीन असल्याचे प्रमाणपत्र विभागीय कृषी अधिकारी देत आहेत. जमीन रूपांतरणासाठीचा घोटाळा निश्चितपणे उघड करणार आहोत. समन्स आले वा चौकशी झाली तरीही कलम ‘३९ अ’ विरोधातील लढा चालूच राहणार आहे, असा निर्धार ‘आप’चे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी व्यक्त केला. या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचीही आमची तयारी आहे.
नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांच्या बंगल्यावर काढलेल्या मोर्चा प्रकरणी विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांच्यानंतर आमदार व्हेंझी व्हिएगस यांनाही चौकशीचे समन्स जारी करण्यात आले होते. समन्सनुसार मंगळवारी सायंकाळी त्यानी पणजी पोलीस स्थानकावर हजेरी लावली.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या साखळी मतदारसंघातील जमीन रूपांतरण रद्द केले आहे. साखळीप्रमाणे इतर भागातील जमीन रूपांतरणसुद्धा त्यांनी रद्द करावे. जमीन रूपांतरणासह पर्यावरणाला हानिकारक असलेले प्रकल्प रद्द करण्याची मागणी मी विधानसभेत केली होती. रेईस मागूश येथील डीएलएफ प्रकल्प, सांकवाळ येथील भूतानी व लोढाचा प्रकल्प रद्द करण्याची माझी मागणी कायम आहे.