नीट यूजी २०२६ पेपरफुटी : ५ लाखांपासून ३० हजारांत विकला गेला पेपर

राजस्थान ते केरळपर्यंत धागेदोरे, १४ जणांना अटक

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
2 hours ago
नीट यूजी २०२६ पेपरफुटी : ५ लाखांपासून ३० हजारांत विकला गेला पेपर

जयपूर : देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट यूजी २०२६'  पुन्हा एकदा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यावर्षी देशभरातून एकूण २२,०५,०३५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, मात्र आता या परीक्षेत कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीचे गंभीर आरोप होत आहेत. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या या प्रकरणाच्या चौकशीचे धागेदोरे आता थेट केरळपर्यंत पोहोचले असून, राजस्थान पोलिसांच्या विशेष ऑपरेशन्स ग्रुपने (SOG) आतापर्यंत १४ आरोपींना अटक केली आहे.

३ मे रोजी झालेल्या या परीक्षेच्या एक दिवस आधी, म्हणजेच २ मे च्या रात्री सीकर आणि झुंझुनू परिसरात एक 'गेस पेपर' वेगाने व्हायरल झाला होता. प्राथमिक तपासात समोर आलेली माहिती धक्कादायक आहे; सुरुवातीला हा पेपर २ ते ५ लाख रुपयांना विकला जात होता. मात्र, परीक्षेची वेळ जवळ येताच त्याची किंमत ३० हजार रुपयांपर्यंत खाली आली. व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि स्थानिक फोटोकॉपीच्या दुकानांमधून हा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला होता. एसओजीचे एडीजी विशाल बन्सल यांनी या व्यवहारांना दुजोरा दिला असून डिजिटल पुराव्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे.

या प्रकरणाला 'केरळ कनेक्शन' मिळाल्याने तपासाची व्याप्ती वाढली आहे. केरळमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने हा पेपर राजस्थानमधील एका कौन्सिलरला पाठवला होता. तपासादरम्यान असे दिसून आले की, सुमारे ४०० प्रश्नांच्या संचापैकी १ प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांशी तंतोतंत जुळत आहेत. विशेषतः जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांचे प्रश्न सर्वाधिक मॅच झाले आहेत. यामुळे हा केवळ 'गेस पेपर' नसून एक सुनियोजित पेपरफुटीचा कट असल्याची शक्यता बळावली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १४ जणांना अटक केली आहे. यात झुंझुनू येथून १३ संशयितांना, तर एका प्रमुख आरोपीला उत्तराखंडमधील डेहराडून येथून ताब्यात घेण्यात आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सुरुवातीला हे आरोप फेटाळले होते, मात्र तक्रारींचा ओघ वाढल्याने आता हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांकडे सोपवण्यात आले आहे. जीपीएस ट्रॅकिंग, एआय सीसीटीव्ही आणि ५जी जॅमर यांसारखी कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही प्रश्नपत्रिका बाहेर कशी आली, यावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस करत आहेत. 


हेही वाचा