
पाकिस्तान : पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतात शनिवारी उशिरा रात्री एका भीषण आत्मघाती हल्ल्याने खळबळ उडाली आहे. बन्नू जिल्ह्यातील 'फतेह खेल' पोलीस तपासणी चेकपोस्टवर एका आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेले वाहन आदळले. या भीषण स्फोटात किमान १५ पोलीस कर्मचारी ठार झाले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याचा आवाज संपूर्ण जिल्हाभर ऐकू आला. स्फोटामुळे पोलीस तपासणी नाक्याची इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली, ज्यामुळे अनेक पोलीस कर्मचारी ढिगाऱ्याखाली गाडले गेले. केवळ पोलीस चौकीच नव्हे, तर आजूबाजूच्या अनेक नागरी घरांचेही मोठे नुकसान झाले असून काही घरांची छते कोसळली आहेत.
घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखालून आतापर्यंत तीन पोलीस कर्मचाऱ्यांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, काळोख आणि दहशतवाद्यांकडून पुन्हा हल्ला होण्याच्या भीतीने बचाव कार्यात मोठे अडथळे येत होते. डीआयजी सज्जाद खान यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. रहमत अयाज, सनाउल्ला, नियाज अली, हबीब, सादुल्ला जान, कामरान यांच्यासह १५ जवानांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याची पुष्टी प्रशासनाने केली आहे.
खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. दुसरीकडे, 'बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट'ने बलुचिस्तानमधील विविध भागांत १० कारवाया केल्याचा दावा केला असून, त्यात १० सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये एकाच वेळी विविध प्रांतात सुरक्षा दलांवर झाले आहे. सध्या संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवली जात असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.