
लोणावळा: आजकालच्या 'इन्स्टाग्राम' आणि 'प्री-वेडिंग'च्या जमान्यात लग्नातील धार्मिक विधींपेक्षा फोटोशूटला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे चित्र वारंवार दिसते. मात्र, हाच दिखाऊपणा लोणावळ्यातील एका विवाह सोहळ्यात वधू-वर पक्षाला चांगलाच अंगलट आला आहे. तासनतास चाललेल्या फोटोसेशनमुळे आणि मुहूर्ताची वेळ पाळली न गेल्याने वैतागलेल्या एका भटजींनी चक्क तुम्हीच लावा आता लग्न! मी जातो..! असे ठणकावून सांगत भर मांडवातून काढता पाय घेतला. या अनपेक्षित प्रकारामुळे नवरदेव-नवरीसह वऱ्हाडींचीही मोठी फजिती झाली.
लोणावळ्याजवळील एका रिसॉर्टवर काल शनिवारी हा विवाह सोहळा पार पडत होता. लग्नाचा मुहूर्त जवळ आला असतानाही वधू आणि वर पक्षाकडील मंडळी फोटोसेशन, व्हिडिओग्राफी आणि व्हीआयपी पाहुण्यांच्या स्वागतात इतकी मग्न होती की, कोणालाही मुहूर्ताचे भान राहिले नाही. भटजी वारंवार लग्नाच्या विधीसाठी नवरदेव-नवरीला बोलावण्याचे सांगत होते, मात्र गोंधळ थांबण्याचे नाव घेत नव्हता. अखेर मुहूर्ताची वेळ टळून गेल्यावर भटजींचा संयम सुटला. त्यांनी शांतपणे आपले पूजेचे साहित्य बॅगेत भरले आणि उपस्थित नातेवाईकांना माझ्याकडे वेळ नाही, आता तुम्हीच हे लग्न लावून घ्या, मी जातो, असे स्पष्ट शब्दात सुनावले आणि तेथून थेट निघून गेले.
भटजींच्या या कृतीमुळे काही काळ लग्नमंडपात सर्वच स्तब्ध झाले , तर काही पाहुण्यांमध्ये हशा पिकला. नवरी आणि नवरदेवाची अवस्था तर 'शॉक' लागल्यासारखी झाली होती. भटजी गेल्यानंतर दोन्ही पक्षांची चांगलीच तारांबळ उडाली. काही वडीलधारी माणसे त्यांचा पाठलाग करत बाहेर धावली, तर काहींनी फोनवरून त्यांची माफी मागत मनधरणी सुरू केली. जवळपास अर्ध्या तासाच्या समजुतीनंतर आणि पुन्हा वेळेचे भान राखण्याचे आश्वासन दिल्यानंतर भटजी पुन्हा मंडपात परतले आणि त्यांनी विवाह सोहळा पार पाडला.
या घटनेमुळे लोणावळा आणि पुण्यातच नव्हे तर सोशल मीडिया जिथपर्यंत पोहोचू शकेल तिथपर्यंत, लग्नकार्यात वेळेच्या नियोजनावर चर्चा सुरू झाली आहे. लग्नासारख्या पवित्र सोहळ्यात मुहूर्तापेक्षा फोटोशूटला आणि बाह्य देखाव्याला दिले जाणारे अवाजवी महत्त्व कितपत योग्य आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. भटजींनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे अनेकांनी त्यांचे समर्थन केले असून, वेळेची किंमत न राखणाऱ्यांना असाच धडा मिळायला हवा, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. एकूणच, हा सोहळा आता लग्नापेक्षाभटजींच्या त्या 'आक्रमक' पावित्र्यासाठीच जास्त चर्चेत राहणार आहे.