
पणजी : गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा तपासणी दरम्यान एका प्रवाशाच्या बॅगेत जिवंत काडतुसांची रिकामी खोकी (Empty Cartridges) सापडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मोपा विमानतळ पोलिसांनी मुंबईतील एका ३६ वर्षीय प्रवाशावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरंग चेतन दोशी (रा. मुंबई) हा प्रवासी मोपा विमानतळावरून बेंगळुरूला जाण्यासाठी आला होता. विमानतळावरील सुरक्षा तपासणी दरम्यान त्याच्या सामानाची झडती घेतली असता, सुरक्षा रक्षकांना ९ मिमी आणि ७.६२ मिमी कॅलिबरची दोन रिकामी काडतुसे मिळून आली.
या वस्तू बाळगण्याबाबत वैध परवाना किंवा इतर कोणतीही कागदपत्रे प्रवाशाकडे उपलब्ध नव्हती. त्यामुळे विमानतळ सुरक्षा पथकाने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मोपा पोलिसांनी संबधित प्रवाशाविरुद्ध आर्म्स ॲक्ट (शस्त्र कायदा) अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. ही काडतुसे त्याच्याकडे कोठून आली, याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.