आज आरजीपीचे नेते एकमेकांना भेटीचे आमंत्रण देत आहेत, पण ते भेटू शकत नाहीत, एवढा वाद विकोपाला गेला आहे. पक्षात उंटावरचेच शहाणे जास्त झाल्यामुळे समजूतदारपणापेक्षा मूर्खपणाच जास्त दिसत आहे.

विधानसभेच्या निवडणुका डिसेंबरपर्यंत होऊ शकतात अशा अंदाजाने भाजप, काँग्रेस कामाला लागले आहेत. निवडणुका कधी होतील याची कल्पना भाजपला असेलही, पण त्या डिसेंबर ते मार्च दरम्यान होण्याची शक्यता आहे. पण २०२७ च्या सुरुवातीला जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू होत असल्यामुळे त्यापूर्वीच डिसेंबरमध्ये निवडणुका घेण्याचा विचार होऊ शकतो. त्यामुळेच भाजपने तयारी चालवली आहे. केंद्रात आणि गोव्यात सत्तेत असल्यामुळे भाजपला तयारीसाठी जास्त वेळ नको, पण इतर पक्षांना निवडणुका कधी होतील याची काही कल्पना नसल्यामुळे, त्यांनी आतापासून तयारीला लागण्याची गरज आहे. काँग्रेसने ती तयारी ठेवली आहे. गोवा फॉरवर्डने आपले मतदारसंघ हेरून तिथे तयारी सुरू केली आहे. इथे जागा मिळतील की नाही याचा अंदाज नसला तरी आम आदमी पक्षाचे दिल्लीतील नेते गोव्यात ठाण मांडून आहेत. पंजाब, गोव्यावर त्यांचे विशेष लक्ष आहे. मगो नेहमीप्रमाणे तीन-चार मतदारसंघांवर आपले लक्ष केंद्रित करेल. राहता राहिला रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्ष. त्याचे सध्या दोन तुकडे होऊ शकतात. त्या पक्षात उंटावरचे शहाणेच जास्त आहेत हे आता लोकांना कळू लागल्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहणारे सध्या कपाळाला हात लावून बसले आहेत. विदेशातून फूल ना फुलाची पाकळी पाठवणारे दानवीर आता कोणाचा झेंडा हाती घ्यायचा, या विचारात आहेत.
मनोज परब आणि वीरेश बोरकर यांना मानणारे दोन गट झाल्यामुळे देणगीदारही पेचात सापडले आहेत. इतर पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले असताना आरजीपीमधील वैर उफाळून आले आहे. आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब विरुद्ध आरजीपीचे एकमेव आमदार वीरेश बोरकर असे दोन गट पडल्यामुळे तरुणांनी स्थापन केलेला हा पक्ष सध्या टीकेचा धनी होत आहे. लोक अविश्वास व्यक्त करू लागले तरीही पक्षातील हे दोन्ही नेते एकमेकांना सोशल मीडियावर ज्ञान देत आहेत. एकमेकांची उणीधुणी काढत आहेत. गोव्यातील तरुण पिढीला राजकारणाकडे आकर्षित करणारा हा राजकीय पक्ष एका निवडणुकीत एक आमदार निवडून आणू शकला. पण दुसरी निवडणूक येण्यापूर्वी आपापसातील मतभेद चव्हाट्यावर मांडून पक्ष गुंडाळण्याच्या विचारापर्यंत आला. एवढा वाद गोव्यात हल्ली कुठल्या पक्षात दिसला नव्हता.
मगो पक्षात काही वर्षांपूर्वी पांडुरंग राऊत विरुद्ध ढवळीकर बंधू, लवू मामलेदार विरुद्ध ढवळीकर बंधू असा वाद गोव्यातील लोकांनी पाहिला. पण त्याही वेळी सोशल मीडियावर एकमेकांवर तुटून पडण्याची वेळ आलेली नव्हती. किंबहुना ते नेतेही तसे सोशल मीडियावर सक्रिय नव्हते. सोशल मीडियावरील चर्चेतूनच जन्माला आलेला हा आरजी पक्ष आता त्याच सोशल मीडियावर पेटलेल्या वादानंतर संपण्याच्या मार्गावर आहे. या पक्षात तरुणांचाच भरणा असल्यामुळे आणि पक्षावर तसे कोणा वरिष्ठांचे नियंत्रण नसल्यामुळे एकमेकांवर तुटून पडणाऱ्या तरुणांना कोणीच रोखू शकले नाही. कुठलाच विचार न करता आणि पक्षाचे भवितव्य न पाहता काही तरुणांनी या पक्षात दुफळी निर्माण केली. जातीय वाद निर्माण करण्यापासून ते पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांच्यावर आरोप करून पक्षातील वादात तेल ओतण्याचे काम त्यांनी केले. मनोज परब आणि वीरेश बोरकर यांच्यात दरी निर्माण केली. मनोज परब यांनी सोशल मीडियावर नैराश्य दाखवले. त्यानंतर वीरेश बोरकर यांनी समजूतदारपणा दाखवायचा सोडून परब यांना डिवचण्याचेच काम केले. दोघांमधील वादानंतर पक्षाला पाठिंबा देणारे गोव्यातील आणि विदेशात राहणारे हितचिंतकही नाराजी व्यक्त करू लागले. ‘याचसाठी आरजीपीला पाठिंबा दिला होता का?’ असे प्रश्न लोक स्वतःलाच विचारू लागले. आरजीपी फुटला तर लोकही विभागले जातील, याची जाणीव कदाचित या पक्षाच्या नेत्यांना नाही. तेवढी राजकीय परिपक्वता या पक्षातील नेत्यांमध्ये नाही, हे या वादातून साऱ्या गोव्यानेच अनुभवले. या तरुणांवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही, असे म्हणणाऱ्यांना आयतेच कोलीत मिळाले. आज आरजीपीचे नेते एकमेकांना भेटीचे आमंत्रण देत आहेत, पण ते भेटू शकत नाहीत, एवढा वाद विकोपाला गेला आहे. पक्षात उंटावरचेच शहाणे जास्त झाल्यामुळे समजूतदारपणापेक्षा मूर्खपणाच जास्त दिसत आहे.