राज्यस्तरीय बँक समितीचा (एसएलबीसी) अहवाल
पणजी : मागील काही वर्षांत पारंपरिक बँक खात्यांपेक्षा शेअर बाजारातील गुंतवणूक वाढली आहे. असे असले तरी गोव्यातील (Goa) बँक खात्यातील ठेवींमध्ये देखील वाढ होत आहे. एका वर्षात गोमंतकीयांच्या बँक ठेवींमध्ये (bank deposit) ९,२६५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. राज्यस्तरीय बँक समितीच्या (एसएलबीसी) अहवालांतून ही माहिती मिळाली आहे. समितीमध्ये राज्यातील ४७ बँकांचा समावेश आहे. यात १२ राष्ट्रीयकृत, १७ खासगी, १२ सहकारी, तर ६ लघु वित्त बँकांचा समावेश आहे.
अहवालानुसार, ३१ मार्च २०२५ अखेरीस राज्यातील विविध बँकांमध्ये गोमंतकीयांच्या १.२१ लाख कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. ३१ मार्च २०२६ अखेरीस त्यात वाढ होऊन त्या १.३५ लाख कोटी रुपये झाल्या. वरील कालावधीत बँक ठेवींमध्ये ७.३४ टक्के वाढ झाली आहे. राज्यातील एकूण ठेवींपैकी ६७ टक्के ठेवी या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये आहेत. याशिवाय खासगी बँकेत २८ टक्के, सहकारी बँकेत ४.९५ टक्के, तर लघु वित्तीय बँकेत सर्वांत कमी म्हणजेच ०.५ टक्के ठेवी होत्या. एका वर्षात बँकांतर्फे वितरित करण्यात आलेल्या कर्जांच्या रकमेत देखील वाढ झाली आहे.
सर्वाधिक कर्ज राष्ट्रीयीकृत बँकांनी मंजूर केली आहेत. मार्च २०२५ अखेरीस राज्यातील बँकांचे कर्ज आणि ठेवींचे गुणोत्तर (सीडी रेशो) ३४.१४ टक्के होते. मार्च २०२६ अखेरीस ते ०.४८ टक्क्यांनी वाढून ३४.६२ टक्के झाले. याआधीची आकडेवारी पाहता राज्यातील विविध बँकांच्या बँक खात्यात ३१ मार्च २०२३ अखेरीस १.०४ लाख कोटी, ३१ मार्च २०२४ अखेरीस १.१७ लाख कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. एका वर्षात बँकांमधील झिरो बॅलन्स खात्यांमध्ये ४,५२५ ने वाढ झाली असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
