सांत आंद्रे आरजीपी सदस्यांचा मनोज परब गटावर आरोप

पणजीः आरजीपीमधील (Revolutionary Goans Party) अंतर्गत वाद संपण्याचे नाव घेत नाही. सांत आंद्रे आरजीपी गटामध्ये फूट घालण्याचे प्रयत्न मनोज परब यांचा गट करतो, असा आरोप आरजीपीच्या सांत आंद्रे गटाने केला आहे. सांत आंद्रे गटाच्या सदस्यांवर जे आरोप झाले आहेत; त्याविषयी आम्ही स्पष्टीकरण मागितले आहे. मात्र, कार्यकारिणी समिती उत्तर देत नाही. तसेच मनोज परब आरजीपी पक्ष बंद करतो; असे त्यांच्या जवळच्या माणसांनी आम्हाला सांगितले असल्याचा आरोप आरजीपीच्या सांत आंद्रे गटाने केला आहे.
पिलार येथे सांत आंद्रे आमदाराच्या कचेरीत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत आरजीपी सांत आंद्रेच्या सदस्यांनी पक्षाच्या अंतर्गत वादावर भाष्य केले.
हल्लीच झालेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत सेबी, मॉनिको, कॅन्डीदो, अनिश आणि विठू या पाच सदस्यांना नियुक्त केले होते. त्या बैठकीत आम्हाला मनोज संदर्भात तुम्हाला काय वाटते असा प्रश्न आम्हाला करून बरेवाईट सांगायला लावले. आम्ही पक्षाच्या विचारसरणीला धरून आहोत आणि मनोज परब यांनी आम्हाला पुढे नेले असे सांगितले. पण सेबी यांनी आम्ही मनोज विषयी वाईट बोललो असा आरोप केला. पण आम्ही त्यांच्याकडे याविषयी पुरावा मागितला, असे आरजीपी सांत आंद्रेचे सरचिटणीस मनोज माशेकर यांनी सांगितले.
पूर्वी कसे श्रीकृष्ण परब विरुद्ध मनोज परब स्थिती निर्माण झाली होती. तशीच स्थिती वीरेश बोरकर (Viresh Borkar) आणि मनोज परब यांच्यामध्ये करण्याची तयारी सुरू आहे. हा विषय २०२३ पासून सुरू आहे. पण निवडणूक जवळ पोहोचताच हा विषय घेतला. सांत आंद्रे गटाचा मये गट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी टीका माशेलकर यांनी केली.
आम्ही प्रश्न विचारले म्हणून आक्रमक भूमिका घेतली असा आरोप समितीने केला. प्रश्न विचारणे हा आमचा हक्क आहे. त्यासाठी या आरोपांविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी एक बैठक घेण्यासाठी आम्ही आरजीपीचे सचिव विश्वेश नाईक यांना इमेल पाठवला. पण चर्चा करण्यासाठी आम्हाला अजूनही कसलेच उत्तर आले नाही, असे माशेलकर म्हणाले.
३ मे रोजी मला मनोज परब (Manoj Parab) यांच्याजवळचे असलेले निलेश गावकर यांनी फोन करून सांगितले की, भाई (मनोज परब) पक्ष बंद करायला शोधतात आणि माझे मत विचारले. मी सांगितले गोवा वाचवण्यासाठी मुलांनी त्रास काढले आहेत. आणि पक्ष बंद होणार हे मला सत्य वाटत नाही. त्यानंतर कार्यकारी समितीचे सदस्य प्रेमानंद गावडे यांनी ८० टक्के सदस्यांनी पक्ष बंद करण्यास एकमत दाखवले म्हणून सांगितले. पण या विषयीचा निर्णय झाला नाही. कार्यकारी समिती हा निर्णय गटाला विश्वासात न घेता घेऊ शकत नाही, असे तुषार गावस यांनी सांगितले.
आमदार कॉंग्रेसमध्ये जाणार नाही : तुषार गावस
कॉंग्रेसमध्ये आपण सामिल होणार नाही असे आमदाराने सांगितले आहे. मनोज परब यांचे सहकारीच या अफवा उठवत आहेत. कॉंग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्न आल्यास आमदार गटाला विश्वासात घेणार. मडगावात झालेल्या बैठकीत नेमके काय घडले; याचे स्पष्टीकरण स्वत: आमदार वीरेश बोरकर देणार असे तुषार गावस यांनी सांगितले.