सीमांकन प्रक्रिया थांबवण्याची आमदार संकल्प आमोणकर यांची मागणी

वास्को : मुरगाव बंदर अधिकारिणी (एमपीए) (MPA) येथील वालंकिणी कॉपेलजवळ (Chapel) जमिनीचे सीमांकन करण्यास आले असता; स्थानिकांनी त्याला विरोध केल्याने तणाव निर्माण झाला. यासंदर्भात मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर (Sankalp Amonkar) यांना माहिती मिळताच त्यांनी याठिकाणी येऊन सीमांकन प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी केली. कॉपेलच्या एक इंज जागेलाही हात लावू देणार नसल्याचा इशारा आमदार आमोणकर यांनी दिला.
वालंकिणी कॉपेल परिसरात जमिनीचे सीमांकन (डिमार्केशन) करण्यासाठी एमपीएचे अधिकारी आले होते. याची माहिती मिळताच पॅरिश प्रिस्ट फादर झेवियर ब्रागांझा यांच्यासहीत मोठ्या संख्येने स्थानिक याठिकाणी एकत्र झाले. त्यांनी जमिनीचे सीमांकन करण्यास विरोध केला. सीमांकन करू दिले जाणार नसल्याचा इशारा देत स्थानिक याठिकाणी ठाम मांडून राहिले.
त्यानंतर याची माहिती मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांना मिळाली. त्यांनी तत्काळ धाव घेत एमपीएच्या अधिकाऱ्यांकडे चर्चा केली. त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर सीमांकनाची प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी केली व कॉपेलच्या एक इंच जागेलाही हात लावू देणार नसल्याचा इशारा दिला.
जमिनीचे सीमांकन करण्यासाठी आलेल्या एमपीएच्या अधिकाऱ्यांना रोखल्याने; त्याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे याठिकाणी पोलीस कुमकही दाखल झाली. स्थानिकांनी कॉपेल परिसराच्या संरक्षणासाठी एकजूट दाखवत प्रशासनाच्या कारवाईविरोधात नाराजी व्यक्त केली. याठिकाणी पोलीस बंदोबस्त (Goa Police) ठेवण्यात आला असून, एकूण घडामोडींवर पोलीस व प्रशासन लक्ष ठेवून आहे.