नीट पेपरफुटी प्रकरण; लीक झालेली प्रश्नपत्रिका मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये सापडली : सीबीआय

लीक झालेला पेपर आपल्या मुलाला दिल्याचा संशय; ९ दिवसांची सीबीआय कोठडी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
नीट पेपरफुटी प्रकरण; लीक झालेली प्रश्नपत्रिका मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये सापडली : सीबीआय

लातूर :  देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी (NEET (UG) 2026 Examination Paper leak issue)   प्रकरणात लातूरच्या रेणुकाई करिअर सेंटरचे संस्थापक शिवराज रघुनाथ मोटेगावकर (Shivraj Motegaonkar)  यांच्याबाबत सीबीआय तपासात (CBI inquiry) धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनटीएच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलमध्येच स्वतःच्या विश्वासातील व्यक्तींना घुसवून पेपरफुटीचा कट रचल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.

तपासानुसार, मोटेगावकर यांनी त्यांच्या क्लासमध्ये कार्यरत असलेल्या पी. व्ही. कुलकर्णी यांची एनटीएच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलवर नियुक्ती करून घेतली होती. कुलकर्णी केमिस्ट्री तर मांढरे बायॉलॉजी विषयाच्या प्रश्नपत्रिकांशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. या दोघांच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका आधीच मिळवून त्या मोटेगावकरांपर्यंत पोहोचवल्या जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सीबीआयच्या तपासात, पेपरफुटीच्या आधारे विद्यार्थ्यांचे गुण वाढवून आपल्या कोचिंग क्लासची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. यामुळे अधिकाधिक विद्यार्थी आपल्या क्लासकडे आकर्षित व्हावेत, हा त्यामागील उद्देश असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.

मोटेगावकरने लीक झालेला पेपर आपल्या मुलाला दिल्याचा संशय 

दरम्यान, मोटेगावकर यांनी स्वतःच्या मुलालाही कथित लीक झालेला पेपर दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. यंदा त्यांचा मुलगाही बारावीमध्ये शिकत असून; त्याने नीट परीक्षा दिली होती. मुलाला वैद्यकीय प्रवेशासाठी जास्त गुण मिळावेत, या हेतूनेच पेपरफुटी करण्यात आली का, याचाही सीबीआय सखोल तपास करत आहे.

एनटीएच्या प्रश्नपत्रिका पॅनलवर या दोघांची नियुक्ती कशी झाली, एनटीएमध्ये मोटेगावकर यांचे नेमके कोणाशी संबंध होते, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या विविध अंगांनी सुरू आहे. तपासात अनेक नवीन लिंक समोर येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सीबीआयने न्यायालयात दावा केला की, मोटेगावकर हे प्रश्नपत्रिका फोडणे आणि ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या संघटित टोळीचे सक्रिय सदस्य होते. त्यांच्या कोचिंग सेंटरच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पुरवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

नऊ दिवसांची सीबीआय कोठडी 

दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयात (Special CBI Court, Delhi)  सोमवारी झालेल्या सुनावणीत विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी मोटेगावकर यांना नऊ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे सांगत सीबीआयने १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.

लीक झालेली प्रश्नपत्रिका मोबाईलमध्ये सापडली : सीबीआय 

विशेष म्हणजे, मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेची कथित लीक झालेली प्रश्नपत्रिका आढळल्याचा दावा सीबीआयने केला असून, या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा