पर्वरी पोलिसांकडून तपास सुरू

म्हापसा : एकोशी येथे अनंत साळगावकर यांचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे ४.५० लाख रुपये किंमतीचे दागिने लंपास केले. घरातील कपाटात असलेल्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला.
ही चोरीची घटना सोमवारी दुपारी २ ते सायंकाळी ५ च्या दरम्यान घडली. घरात शिरताना चोरांनी कोणतीही मोडतोड केल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे चोर नेमके घरात कसे शिरले याचा थांगपत्ता लागलेला नाही.
घर मालक साळगावकर हे पर्यटक टॅक्सी व्यावसायिक असून; ते प्रवासी भाडे घेऊन गेले होते. घरातील इतर मंडळी देखील आपापल्या कामावर गेली होती. तर घरात असलेली एक महिला घर बंद करून पर्वरी मार्केटमध्ये गेली होती.
ती घरात परतल्यावर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरांनी घरातील कपाट कोयता फोडले आणि आतील तिजोरीत ठेवलेले साळगावकर कुटुंबीयांचे सर्व दागिने चोरून नेले. चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत अंदाजे साडेचार लाख रुपये आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पर्वरी पोलिसांनी (Porvorim Police station) घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. घर मालक साळगावकर हे गोव्याबाहेर (Goa) होते. त्यामुळे काल ते तक्रार दाखल करण्यासाठी उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांनी आज मंगळवारी १९ रोजी पोलिसांत तक्रार केली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.