पुराव्याअभावी न्यायालयाचा निर्णय; साक्षीदारांच्या जबाबात विसंगती

वाळपई : येथील बाजारात चहाच्या दुकानात घुसून तोडफोड, जमाव जमवून हल्ला तसेच स्कूटर व अन्य साहित्याची नासधूस केल्याप्रकरणी सर्व संशयित ४२ जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. वाळपई ग्राम न्यायाधिकारी पूर्वा नाईक यांनी हा निकाल देताना प्रत्येक आरोपीला पाच हजार रुपयांच्या हमीवर मुक्त करण्याचे आदेश दिले.
ही घटना ८ मार्च २०१७ रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास वाळपई बाजारातील विशांत कुडतकर यांच्या चहाच्या दुकानात घडली होती. या प्रकरणात सुनील गावस, ऋषिकांत च्यारी यांच्यासह एकूण ४२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी जबरदस्तीने दुकानात घुसून स्कूटर व इतर साहित्याची तोडफोड केली तसेच जमाव जमवून हल्ला केला होता.
मात्र, सुनावणीदरम्यान सर्व आरोपींनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत, आपल्याला खोट्या प्रकरणात अडकविण्यात आल्याचा दावा केला. या प्रकरणात फिर्यादी विशांत कुडतरकर यांनी सुमारे १०० जणांनी दुकानात हल्ला केल्याचे म्हटले होते. त्यांनी काही आरोपींची नावे पोलिसांना दिली होती. तसेच एका साक्षीदाराने घटनेचा व्हिडिओ पोलिसांकडे सुपूर्द केल्याचे सांगितले होते.
परंतु तपास आणि न्यायालयीन सुनावणीदरम्यान अनेक महत्त्वाच्या बाबींमध्ये विसंगती आढळून आली. घटनेची तारीख, हल्लेखोरांची संख्या तसेच घटनास्थळी उपस्थिती याबाबत साक्षीदारांच्या जबाबात तफावत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर काही आरोपी उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात जमावाने हल्ला केल्याचे ठोस पुरावे न्यायालयात सादर करण्यात अपयश आले.
विशेष म्हणजे, फिर्यादींकडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, नुकसानग्रस्त स्कूटर, फ्रीज व इतर साहित्य जप्त करण्यात आले नसल्याचेही सुनावणीदरम्यान स्पष्ट झाले. यामुळे तपास प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
पुरावे, साक्षी कमकुवत ठरल्या
या प्रकरणात न्यायालयाने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला. जमाव प्रत्यक्ष अस्तित्वात होता का, आरोपी त्या जमावाचे सदस्य होते का, आरोपींनी जाणूनबुजून हल्ल्यात सहभाग घेतला होता का, तसेच जमावाचा समान उद्देश होता का, या सर्व मुद्द्यांवर सरकारी पक्षाला ठोस पुरावे सादर करता आले नाहीत. संशयाच्या पलीकडे आरोप सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याने सर्व ४२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.