२०० पानी आरोपपत्र : १९ साक्षीदारांच्या साक्षी नोंद

पणजी : कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित सोहम नाईक याच्या विरोधात पाच गुन्हे दाखल झाले आहेत. यातील एका लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा शाखेने केपे येथील प्रथमवर्ग न्यायालयात सोहमच्या विरोधात सुमारे २०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. तर त्यात १९ साक्षीदारांची साक्ष नोंद करण्यात आली. आतापर्यंत सोहम विरोधात दोन गुन्ह्यांत आरोपपत्र दाखल केले. तर, एका प्रकरणात तो अल्पवयीन असल्यामुळे जुविनील जस्टीस मंडळाकडे अहवाल सादर केला आहे.
कुडचडे येथील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर कुडचडे पोलिसांनी रविवार, २२ मार्च रोजी गुन्हा दाखल करून संशयित सोहम नाईक याला अटक केली होती. त्यानंतर दोघा अल्पवयीन मुलींनी दोन वेगवेगळ्या तक्रारी पोलिसांत दाखल केल्या. त्यानंतर वरील तिन्ही प्रकरणे गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आली. सोहम विरोधात आणखीन दोन गुन्हे दाखल करण्यात आले. पाचपैकी गुन्हा शाखेने पहिल्या गुन्ह्यात सोहम विरोधात केपे येथील प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यावेळी संशयित सोहम १८ वर्षांखालील असल्यामुळे जुविनील जस्टीस मंडळाकडे अहवाल सादर केला आहे.
दरम्यान, १४ वर्षीय मुलीने कुडचडे पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यात संशयित सोहमने २०२४ ते २०२५ या कालावधीत इंस्टाग्रामद्वारे तिला संपर्क केला. त्याने तिला स्वतःचे अश्लील फोटो पाठवले. तिच्या थोरल्या बहिणीशी असलेले नाते सार्वजनिक करण्याची धमकी दिली. तिला प्रत्यक्ष भेटण्यासाठी व वासनापूर्तीसाठी मुलींची माहिती देण्यास सांगितले. तक्रारीची दखल घेऊन कुडचडे पोलिसांनी सोहमविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. हे प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा शाखेने संशयित सोहम विरोधात केपे प्रथमवर्ग न्यायालयात २०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे.