पेडणे मतदारसंघाला आता भावनिक घोषणांपेक्षा विचारशील निर्णयांची गरज आहे. स्थिरता, सातत्य आणि विकासाभिमुख राजकारण हाच पुढचा मार्ग आहे. अन्यथा, पुढील काळात पेडण्याचे निर्णय पेडणेकरांच्या हातात राहणार नाहीत.

पेडणे मतदारसंघ आज एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. हा प्रश्न केवळ निवडणुकीचा नाही; तर या भूमीच्या भवितव्याचा, स्थानिकांच्या हक्कांचा आणि पुढील पिढीच्या उद्याचा आहे.
गेली अनेक वर्षे पेडण्यातील जनता विकासाची स्वप्ने पाहत आहे. रोजगार, उद्योग, शिक्षण, पर्यटन, शेती, पायाभूत सुविधा आणि सांस्कृतिक विकास या प्रत्येक क्षेत्रात संधी असूनही अपेक्षित गती मात्र कधीच मिळाली नाही. यासाठी केवळ सरकार किंवा एखाद्या नेत्याला जबाबदार धरून चालणार नाही; आपल्या मतदारसंघात निर्माण झालेली राजकीय अस्थिरता आणि सतत नेतृत्व बदलण्याची मानसिकता हे त्यामागील मोठे कारण आहे.
आज एक गंभीर वास्तव समोर आहे. निवडणुका जवळ आल्या की अचानक काही चेहरे मतदारसंघात दिसू लागतात. वर्षानुवर्षे जनतेच्या प्रश्नांपासून दूर असणारे हे लोक अचानक “सेवा” करण्यासाठी पुढे येतात. पण प्रश्न असा आहे की, ही सेवा नेमकी कुणाची? पेडणेकरांची, की स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेची?
ज्यांनी पाच वर्षे जनतेच्या समस्या जवळून अनुभवल्या नाहीत, संघर्षात साथ दिली नाही आणि स्थानिकांच्या वेदना केवळ वर्तमानपत्रांतून वाचल्या, असे लोक निवडणुकीच्या तोंडावर अचानक मतदारसंघाचे तारणहार बनतात. त्याहून वेदनादायक गोष्ट म्हणजे अशा लोकांना मिळणारी प्रसिद्धी आणि त्यांच्याभोवती उभी राहणारी कार्यकर्त्यांची गर्दी!
आज केवळ प्रसिद्धीलाच सेवा समजले जात आहे. सोशल मीडियावरील पोस्ट, वर्तमानपत्रातील छायाचित्रे आणि भाषणांची आतषबाजी म्हणजे विकास नव्हे. जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणे, प्रशासनाशी संघर्ष करणे आणि स्थानिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारपुढे दोन हात करण्याची तयारी ठेवणे ही खरी जनसेवा असते. सत्तेपुढे नांगी टाकणे आणि लोकांची दिशाभूल करणे ही सक्षम नेतृत्वाची लक्षणे नाहीत.
मतदारांनी आज एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्यायला हवी - आपल्या समस्या केवळ 'ओळखणारा' नेता पुरेसा नसतो; तर त्या समस्या 'सोडवण्याचे' धाडस ज्याच्यात आहे, तोच खरा नेता असतो.
दुर्दैवाने, पेडण्यात प्रत्येक निवडणुकीत नवे प्रयोग होत राहिले. पण या प्रयोगांमध्ये मतदारसंघाची अनेक वर्षे वाया गेली. प्रत्येक वेळी “नवा चेहरा” शोधताना आपण स्थिर नेतृत्वाची ताकद कमी केली. परिणामी, स्थानिक पातळीवर सक्षम नेतृत्व उभे राहू शकले नाही; आणि जेव्हा स्थानिक नेतृत्व कमकुवत होते, तेव्हा बाहेरचे लोक निर्णय घेऊ लागतात.
स्थानिक पातळीवर विचार मांडणारे, प्रश्न विचारणारे आणि प्रशासनाशी संपर्क ठेवणारे कार्यकर्ते कमी पडले की संपूर्ण नेतृत्वच कमकुवत होते. याचा परिणाम स्पष्ट दिसतो आहे - मोठे प्रकल्प उभे राहतात, मात्र त्यावर आपले वजन राहत नाही. त्याचा फायदा सत्तेत असलेले लोक घेतात. रोजगाराच्या संधी दुसरीकडे वळतात, मंत्री आणि सत्ताधारी आपापल्या भागासाठी विकास खेचून नेतात; आणि इथला स्थानिक युवक मात्र नोकरीसाठी भटकत राहतो.
म्हणूनच, प्रत्येक वेळी उमेदवार बदलणे हा पर्याय असू शकत नाही. उलट, स्थिर झालेल्या नेतृत्वाला अधिक सक्षम करणे, त्यामागे ठामपणे उभे राहणे आणि प्रसंगी कणखर जाब विचारणारा स्थानिक समूह तयार करणे ही काळाची गरज आहे. स्थिर नेतृत्वावर लोकशाहीचा अंकुश असेल, तर ते नेतृत्व खूप काही करू शकते, इतर अनेक मतदारसंघांचा विकास हेच दाखवतो.
यासाठी भावनिक भूलथापांना बळी न पडता सक्षम नेतृत्वासोबत राहणे आवश्यक आहे. विशेषतः पंचायत स्तरावर नवे, अभ्यासू, प्रामाणिक आणि स्थानिक प्रश्नांशी जोडलेले नेतृत्व तयार झाले पाहिजे. गावातील जमिनी विकण्यासाठी हपापलेले दलाल जर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येऊ लागले, तर गावचा विकास आणि गावचे प्रश्न कुठे जातील? याची अनेक उदाहरणे आज आपल्या समोर आहेत.
सुशिक्षित आणि जागरूक गावपातळीवरील नेतृत्व उभे राहिले, तरच बाहेरून येणाऱ्या संधीसाधू राजकारणावर अंकुश ठेवता येईल. अन्यथा, प्रत्येक निवडणुकीत काही रक्कम खर्च करून नवे उमेदवार येतील, आपले नशीब आजमावतील आणि निवडणूक संपली की जनता पुन्हा आपल्या प्रश्नांसह आहे तशीच एकाकी उरेल; जे आजपर्यंत होत आले आहे. कारण सत्य हेच आहे की, नशीब आजमावणाऱ्यांना या मतदारसंघाशी काहीही देणे-घेणे नसते, त्यांना फक्त निवडणुकीशी देणे-घेणे असते.
आज पेडणेकरांनी स्वतःला प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे: आपण मत देताना भविष्याचा विचार करतो आहोत का? आपण नेत्याच्या कामाकडे आणि कर्तृत्वाकडे पाहतो आहोत का, की केवळ तात्पुरत्या वातावरणाकडे? आपण विकासाला मत देणार आहोत, की व्यवहाराला?
जर आजही आपण जागे झालो नाही, तर उद्या आपल्या समस्या या समस्याच राहतील. रस्ते, रोजगार, शिक्षण, उद्योग, पाणी, आरोग्य हे प्रश्न पुन्हा पुढील निवडणुकीत आणि भाषणांत फक्त ऐकायला मिळतील; पण प्रत्यक्षात परिस्थिती तशीच राहील.
पेडणे मतदारसंघाला आता भावनिक घोषणांपेक्षा विचारशील निर्णयांची गरज आहे. स्थिरता, सातत्य आणि विकासाभिमुख राजकारण हाच पुढचा मार्ग आहे. अन्यथा, पुढील काळात पेडण्याचे निर्णय पेडणेकरांच्या हातात राहणार नाहीत. सावध व्हा... भविष्याच्या दृष्टीने आत्ता हीच शेवटची संधी असेल!
- राजमोहन शेटये
लेखक कोरगावचे माजी सरपंच आहेत.