गोव्यातील एसटी आरक्षणासाठी दिल्लीत विशेष पाठपुरावा करणार

पणजी : गेल्या तीन वर्षांत गोव्यात ७० आंतरजातीय विवाह झाले. यामध्ये २०२४ मध्ये १०, २०२५ मध्ये ३७ आणि २०२६ मध्ये आतापर्यंत २३ जोडप्यांची नोंद झाली असून, अशा जोडप्यांना सरकारकडून अडीच लाख रुपयांचे प्रोत्साहनपर आर्थिक साहाय्य दिले जाते, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.
गोव्याच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पर्वरी येथील सचिवालयात समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी गोव्यात सुरू असलेल्या विविध केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री आठवले यांनी केंद्रीय मंत्र्यांनी केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या यशाबद्दल सांगितले की, २०१४ पूर्वी अनेक नागरिकांची बँक खाती नव्हती. मात्र, जनधन योजनेमुळे गोव्यात २.३२ लाख नवीन खाती उघडली गेली. याशिवाय, प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून ४.१५ लाख लाभार्थ्यांनी व्यावसायिक कर्ज घेतले असून, उज्ज्वला योजनेअंतर्गत राज्यात २ हजार मोफत गॅस जोडण्यांचे वाटप करण्यात आले आहे. आरोग्य क्षेत्रात आयुष्मान भारत योजनेचा २९ हजार गोवेकरांनी लाभ घेतला असून, उजाला योजनेद्वारे तब्बल २.६२ कोटी एलईडी बल्बचे वाटप राज्यात झाले आहे.
दिव्यांगांसाठी विशेष सरकारी शाळेची गरज
राज्यातील दिव्यांग आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आठवले यांनी काही त्रुटींवर प्रकाश टाकला. २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात ३३ हजार दिव्यांग असून त्यांना मासिक पेन्शन मिळत असली, तरी त्यांच्यासाठी राज्यात एकही विशेष सरकारी शाळा नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राज्य सरकारने यासंदर्भात प्रस्ताव पाठवल्यास केंद्र सरकार आधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज शाळा उभारण्यास नक्कीच मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
‘एसटी’ समाजाला राजकीय आरक्षण मिळवून देणार
राज्यातील अनुसूचित जमाती (एसटी) समुदायाच्या १६.६ टक्के लोकसंख्येला विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्रीय पातळीवर आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासनही रामदास आठवले यांनी यावेळी दिले. या प्रलंबित मागणीसाठी दिल्लीत विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.