पिर्ण येथील ‘अष्टगंधा’ पतसंस्थेत ११.२८ कोटींचा घोटाळा

माजी संचालक प्रकाश कांदोळकर यांना अटक : ५ दिवचांची काेठडी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
पिर्ण येथील ‘अष्टगंधा’ पतसंस्थेत ११.२८ कोटींचा घोटाळा

पणजी : बार्देश तालुक्यातील पिर्ण येथील 'अष्टगंधा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड' या पतसंस्थेत तब्बल ११ कोटी २८ लाख ९३ हजार २१३ रुपयांची प्रचंड अफरातफर केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने मोठी कारवाई करत पतसंस्थेचे माजी संचालक प्रकाश कांदोळकर (वय ७०, रा. वायडोंगर, पार्से-पेडणे) यांना १९ मे रोजी त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली. अटकेनंतर संशयिताला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
संशयित प्रकाश कांदोळकर यांनी यापूर्वी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. जामीन फेटाळला गेल्याचे स्पष्ट होताच आर्थिक गुन्हा विभागाच्या पथकाने तातडीने हालचाली करत संशयिताचा माग काढला आणि त्यांना पेडणे येथून ताब्यात घेतले.अष्टगंधा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या निधीची अफरातफर झाल्याची तक्रार पतसंस्थेच्या प्रशासक समितीचे अध्यक्ष मंगेश फडते यांनी दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला. त्यानुसार, १४ जुलै २०२३ पूर्वी अस्तित्वात असलेल्या माजी संचालक मंडळाने आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने एकमेकांच्या संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून कर्जाचे वाटप केल्याचे दाखवले. प्रत्यक्षात हा निधी पतसंस्थेतून अनधिकृतपणे काढून स्वतःच्या वैयक्तिक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला होता.
दरम्यान, या मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा पुढील सखोल तपास आर्थिक गुन्हा विभागाचे पोलीस अधीक्षक अर्शी आदिल आणि फ्रान्सिस कोर्त यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे निरीक्षक राहुल परब यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक परेश रामनाथकर करत असून, घोटाळ्यातील इतर संशयितांवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.
कांदोळकरांसह ११ जणांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी आर्थिक गुन्हा विभागाचे पोलीस उपनिरीक्षक परेश रामनाथकर यांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या प्रकाश कांदोळकर यांच्या व्यतिरिक्त माजी संचालक रवींद्र नाईक (मुळगाव-डिचोली), दिगंबर परब (डिचोली), मोहनदास देसाई (कुडचडे), श्रद्धा नाईक (पिर्ण), प्रकाश एल. नाईक, प्रकाश व्ही. नाईक, प्रकाश ए. नाईक, कृष्णा हळर्णकर (शिरसई), चंद्रशेखर बर्वे (अस्नोडा) आणि भारत परब (अस्नोडा) या
इतर ११ माजी संचालक आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.