गोवा : ‘अटल सेतू’ला नवा साज देण्यासाठी होणार ५ कोटी खर्च

मेरशी जंक्शनपासून पर्वरी दरम्यानच्या पुलाला मिळणार नवे रूप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
गोवा : ‘अटल सेतू’ला नवा साज देण्यासाठी होणार ५ कोटी खर्च

पणजी : अटल सेतूचे (Atal Setu) सुशोभीकरण करून त्याला नवा साज देण्याची तयारी पर्यटन खात्याने सुरू केली आहे. मेरशी जंक्शनपासून पर्वरी (Merces junction to Porvorim) दरम्यानच्या पुलाच्या परिसराला नवे रूप देण्यासाठी आणि त्याच्या देखभालीसाठी पुलाचे कलात्मक रंगकाम केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ५.५७ कोटी रुपये इतका खर्च येण्याचा अंदाज आहे.
गोवा पर्यटन विकास महामंडळाने (GTDC) जारी केलेल्या निविदेनुसार, अटल सेतू पुलाचे रक्षण करणे आणि त्याचे सौंदर्य वाढवणे हे या प्रकल्पाचे दोन मुख्य उद्देश आहेत.

पुलाच्या खांबांवर झळकणार कलात्मक चित्रे
रंगकाम करण्यापूर्वी पुलाचा ठरावीक परिसर आणि खांबांची पूर्णपणे स्वच्छता केली जाईल. पुलाच्या खांबांना आणि खांबांच्या वरच्या भागांना मूळ आणि संरक्षणात्मक 'इलास्टोमेरिक' रंग लावला जाईल. हा रंग लवचिक असतो, जो पुलाच्या बारीक भेगा भरून काढतो आणि गोव्याच्या किनारपट्टीच्या हवामानापासून सिमेंटच्या बांधकामाचे रक्षण करतो. त्यानंतर, पुलाच्या मोठ्या काँक्रिटच्या खांबांवर आगळीवेगळी आणि कलात्मक चित्रे (म्युरल) काढून त्यांना एक नवीन रूप दिले जाईल.

हे काम पूर्ण करण्यासाठी १८० दिवसांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. मात्र, यामध्ये पावसाळ्याच्या दिवसांचा समावेश नाही. पावसाळा वगळून १८० दिवसांत हे काम पूर्ण करावे लागेल, जेणेकरून हा विशेष रंग आणि कलाकृती सुक्या हवामानात चांगल्या प्रकारे टिकून राहतील.

अटल सेतूला मोठ्या आर्ट गॅलरीचा लूक
अटल सेतूचे सुशोभीकरण पूर्ण झाल्यानंतर, गोव्यातील या गजबजलेल्या वाहतुकीच्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना एक वेगळाच अनुभव मिळेल आणि हा पूल एका मोठ्या खुल्या आर्ट गॅलरीसारखा दिसेल.

हेही वाचा