‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे कार्य महत्त्वपूर्ण : मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी : बंगळुरू, कर्नाटक येथील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ आश्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भेट दिली. या ठिकाणी आयोजित केलेल्या वैदिक पूजेत मुख्यमंत्री सहभागी झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी श्री श्री रवी शंकर यांचे आशीर्वाद घेतले.
आश्रमातील अाध्यात्मिक वातावरण, भारतीय संस्कृतीतील शाश्वत परंपरा आणि मूल्यांचा अनुभव अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. अशा सकारात्मक वातावरणात मनःशांती, आत्मविश्वास आणि अंतर्गत शक्ती प्राप्त होते, असेही त्यांनी नमूद केले.
भारताच्या प्राचीन अाध्यात्मिक वारशाचे जतन आणि प्रसार करण्यासाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे कार्य महत्त्वपूर्ण असल्याचे गौरवोद्गारही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
गोव्यात जेव्हा आंदोलने होतात तेव्हा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आंदोलकांबरोबर बसून त्यांना खाऊ घालतात, त्यांच्याशी गोष्टी करतात. आंदोलक घोषणा देतात तेव्हा ते त्यांना मिठी मारतात. यामुळे आंदोलनासाठी वेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागेल.
- श्री श्री रविशंकर, संस्थापक, आर्ट ऑफ लिव्हिंग
प्रेम, सेवा व करूणेची शिकवण देणाऱ्या श्री श्री रविशंकर यांनी जगभरातील जनसमुदायाला सकारात्मक विचार व योग्य दिशा देण्याचे कार्य केले आहे. गोव्याला भेट देऊन त्यानी गोमंतकीयांना मार्गदर्शन करावे.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री