पर्यटनमंत्री रोहन खंवटे : भारतीय लोकांचे गोव्याला प्राधान्य, देशी-विदेशी पर्यटकांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा

पणजी : विदेशांतील सहलींवर जाण्यापेक्षा देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य द्या, या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी केलेल्या आवाहनाचा गोव्याला नक्कीच फायदा होईल. जे भारतीय देशाबाहेर लग्न करत होते, त्यांच्यासाठी आता गोवा आणि जयपूर ही लग्नसमारंभासाठी पसंतीची ठिकाणे बनली आहेत. त्यातही भारतीय लोक गोव्याला प्राधान्य देतात, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे (tourism minister of Goa rohan Khaunte) यांनी सांगितले.
मान्सून पर्यटनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी संबंधित घटकांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर माहिती देताना मंत्री खंवटे बोलत होते. यावेळी पर्यटन खात्याचे संचालक केदार नाईक, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर, टीटीएजीचे अध्यक्ष जॅक सुखिजा आणि इतर भागधारक उपस्थित होते.
पावसाळी पर्यटनादरम्यान जंगल सफारी आणि धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यावर निर्बंध येतात. त्यामुळे या गोष्टींवर तोडगा काढण्यासाठी पर्यटन खात्याचे संचालक आणि सचिव हे वन खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेतील. सध्या अनेक नोंदणी नसलेले टूर ऑपरेटर्स कोणतीही जबाबदारी न घेता ग्रामीण भागात पर्यटकांना घेऊन जातात. यामुळे गुप्तपणे पर्यावरणाची हानी होत असून ही चिंतेची बाब आहे. आम्ही पराग रांगणेकर यांना सोबत घेतले आहे, जे जास्तीत जास्त १० लोकांचा गट करून पर्यटकांना फिरवायला नेतील. ते केवळ व्यवसायाच्या हेतूने नव्हे, तर पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या दृष्टीने काम करतील. या अनधिकृत ऑपरेटर्सना रोखण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांकडून सूचना मागवल्या आहेत. या सूचना प्राप्त झाल्यानंतर लगेचच त्यांची अंमलबजावणी केली जाईल, असे खंवटे म्हणाले.
पूर्वी बहुतेक भारतीय डेस्टिनेशन वेडिंगसाठी बहरीन आणि दुबईला जात असत. परंतु अमेरिका-इराण तणावामुळे तिथे अनेक निर्बंध आले आहेत. त्यामुळे लग्नसमारंभ आयोजित करण्यासाठी या पर्यटकांनी गोव्याची निवड केली आहे.महिन्याभरात ‘माईस ब्युरो’ होईल कार्यरत!
- रोहन खंवटे, पर्यटनमंत्री