निवडणुकीसाठी नव्हे समाजाठी एकत्र : मंत्री रमेश तवडकर

प्रेरणा दिनानिमित्ताने गोव्यातील एसटी नेते एकवटले

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
20th May, 06:16 pm
निवडणुकीसाठी नव्हे समाजाठी एकत्र : मंत्री रमेश तवडकर

पणजी : मी, गोविंद गावडे, गणेश गावकर आणि प्रकाश वेळीप हे एसटी समाजाचे नेते केवळ निवडणुकीसाठी एकत्र आलेलो नाहीत, तर समाजाचे हित तसेच विकासासाठी एकत्र आलो आहोत. मी आणि गोविंद गावडे तसेच माजीमंत्री प्रकाश वेळीप यांच्यामध्ये आता कुठलेच मतभेद नाहीत. एसटी समाजाचे सर्व नेते प्रेरणा दिन कार्यक्रमात एका व्यासपीठावर असणार, असे आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकर (Minister for Tribal welfare in Goa, Ramesh Tawadkar) यांनी सांगितले. 

स्व. मंगेश गावकर आणि दिलीप वेळीप यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी यावर्षीचा प्रेरणा दिन कार्यक्रम २५ मे रोजी आंबावली, केपे येथे होणार. दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम होणार. आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी आयोजन समितीचे अध्यक्ष आणि माजीमंत्री प्रकाश वेळीप, एसटी महामंडळाचे अध्यक्ष वासुदेव गावकर आणि इतर नेते उपस्थित होते. 

राज्यात एसटी तसेच आदिवासी समाजाचे प्रमाण ३० टक्के आहे. आमच्यामधील मतभेदांमुळे समाजाचे बरेच नुकसान झाले. पूर्वीचा इतिहास पुन्हा उकरून न काढता आता समाजासाठी एकत्र राहून काम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.  डॉ. काशिनाथ जल्मी, प्रकाश वेळीप या नेत्यांनी समाजासाठी बरेच कार्य केले आहे. आता गोविंद गावडे, वासुदेव गावकर तसेच मी काम करतो, असे रमेश तवडकर यांनी सांगितले. आमदार आंतोन वाज हे काही कामामुळे प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. 

प्रेरणा दिनानिमित्त अटल आसराच्या लाभार्थ्यांना धनादेश तसेच वन हक्कांच्या सनदींचे वाटप करण्यात येणार आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी व कल्याणासाठी विचार करून पुढील १० वर्षांसाठीच्या कार्यक्रमांचा व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात आला आहे. या व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन या कार्यक्रमात होणार. तसेच डॉ. मधू घोडकिरेकर, शशिकांत गावकर, धाकू मडकईकर, रोमाल्डो गोन्साल्वीस यांना प्रज्ञावंत पुरस्कार देण्यात येणार आहे. 

पंचायत क्षेत्रात होणार सुविधा केंद्रे

ज्या पंचायत क्षेत्रात ३५ टक्क्यांहून जास्त एसटी समाजाचे  लोक वास्तव्यास आहेत; त्या पंचायत क्षेत्रात सुविधा केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. एसटी समाजासाठी असलेल्या योजना तसेच इतर सुविधांची माहिती देण्यासाठी ही सुविधा केंद्रे असणार. 




हेही वाचा