पर्यटकांसाठी ‘अंजुणे धरण व्ह्यू पॉईंट’ ठरतोय धोकादायक

चोर्ला घाटात थांबतात पर्यटक : दरीजवळ रेलिंग नसल्याने अपघात शक्य

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
20th May, 09:09 pm
पर्यटकांसाठी ‘अंजुणे धरण व्ह्यू पॉईंट’ ठरतोय धोकादायक

केरी-सत्तरी : चोर्ला घाटातून दिसणारे अंजुणे धरणाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी दररोज पर्यटकांची मोठी गर्दी होत असून सध्या येथील 'व्ह्यू पॉईंट’ परिसर अत्यंत धोकादायक बनला आहे. पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून संभाव्य दुर्घटनेची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

चोर्ला घाटातून ये- जा करणारे पर्यटक येथे राहून फोटो काढतात. चोर्ला घाटातील ‘अंजुणे धरण व्ह्यू पॉईंट’ हे ठिकाण निसर्गप्रेमी, पर्यटक तसेच छायाचित्रकारांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. घाटमाथ्यावरून दिसणारे हिरवेगार डोंगर, खोल दरी आणि अंजुणे धरणाचे रमणीय दृश्य अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक येथे थांबत असतात. विशेषतः सुट्टीच्या दिवशी युवक-युवती, बाईकस्वार तसेच बाहेरील राज्यांतून येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे गर्दी करताना दिसतात.

पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने काही वर्षांपूर्वी येथे लोखंडी पाईप बसवून संरक्षक व्यवस्था केली होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून काही अज्ञात व्यक्तींनी तेथील पाईप काढून नेल्याने परिसर पुन्हा असुरक्षित झाला आहे. सध्या त्या ठिकाणी खोल दरीकडे थेट उघडी जागा निर्माण झाली असून थोडासा निष्काळजीपणा देखील जीवघेणा ठरू शकतो.

विशेष म्हणजे, पावसाळ्यात या परिसरात दाट धुके, जोरदार वारे आणि घसरडे दगड यामुळे परिस्थिती आणखी धोकादायक बनते. घाटातील वळणदार रस्ता, अरुंद पार्किंग व्यवस्था आणि वाहतुकीची वाढती कोंडी यामुळेही पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागतो. काहीवेळा पर्यटक वाहने रस्त्याच्या कडेला उभी करत असल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येते.

स्थानिक नागरिकांनी संबंधित खात्याने तातडीने मजबूत संरक्षक कठडा उभारावा, लोखंडी पाईप पुन्हा बसवावेत, चेतावणी फलक लावावेत तसेच पर्यटनस्थळी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे.

पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या या भागात आवश्यक सुरक्षाव्यवस्था केल्यास भविष्यातील दुर्घटना टाळता येतील, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. 

सेल्फी काढणे ठरतेय धोकादायक

अनेक पर्यटक धोकादायक पद्धतीने कड्याच्या टोकावर उभे राहून फोटो व सेल्फी घेताना दिसतात. काहीजण उरलेल्या पाईपांना टेकून तर काहीजण त्यावर चढून व्हिडिओ व छायाचित्रण करत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. काही पर्यटकांकडून दंगामस्ती, मोठ्या आवाजात संगीत लावणे तसेच मद्यप्राशन करून परिसरात वावरण्याचे प्रकारही घडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

हेही वाचा