वाहनचालकांच्या बेफिकिरीमुळे ९२.६२ टक्के अपघात

चार महिन्यांत ८९ जणांचा मृत्यू : पेडणे, कोलवाळ पोलीस ठाण्यांची हद्द ठरेल ‘अपघात प्रवण’

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
वाहनचालकांच्या बेफिकिरीमुळे ९२.६२ टक्के अपघात

पणजी : गोव्यात रस्ते अपघातांचे सत्र चिंताजनक बनले असून, यंदा १ जानेवारी ते ३० एप्रिल २०२६ या चार महिन्यांत ८५१ अपघात झाले आहेत. त्यात ८९ जणांचा मृत्यू झाला आहे. वाहतूक पोलीस विभागाने जारी केलेल्या मासिक अपघात अहवालानुसार, यातील सर्वाधिक ९२.६२ टक्के अपघात हे वाहन चालकांचा निष्काळजीपणा आणि बेफिकिरीमुळे झाल्याचे समोर आले आहे.
रस्त्यांवरील वाढते अपघात आणि मृत्यूंना आळा घालण्यासाठी गोवा वाहतूक पोलिसांनी विविध उपक्रम आणि मोहिमा राबवल्या आहेत. मात्र, खराब रस्ते, रस्त्यांचे चुकीचे बांधकाम, वाहनचालकांची बेफिकिरी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश वाहतूक खात्याने दिले आहेत.

दुचाकीस्वार सर्वाधिक असुरक्षित
- पेडणे आणि कोलवाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघातांचे प्रमाण पाच पटीने वाढले असून, हा परिसर अतिसंवेदनशील ‘अपघात प्रवण’ क्षेत्र बनला आहे.
राज्यातील एकूण अपघातांमध्ये दुचाकी वाहनांचा वाटा सर्वाधिक आहे. अहवालानुसार, ८५१ अपघातांपैकी ४४.११ टक्के म्हणजे ३७५ अपघात दुचाकीचे, तर सर्वाधिक ७७.५२ टक्के म्हणजे ६९ मृत्यू दुचाकी चालक किंवा सहप्रवाशांचा झाला आहे. उर्वरित २२.४८ टक्के (२० मृत्यू) मध्ये पादचारी, सायकलस्वार आणि इतरांचा समावेश आहे. ४०.५१ टक्के (३४४) अपघात कारमुळे झाले असून, इतर वाहनांमुळे १५.३८ टक्के (१३२ अपघात) झाले आहेत.
या व्यतिरिक्त सर्वाधिक ३३.६४ टक्के अपघात राष्ट्रीय महामार्गावर झाले. रात्रीच्या तुलनेत दिवसा ५१६ तर रात्री ३३५ अपघात झाल्याची माहिती वाहतूक विभागाच्या मासिक अपघात अहवालानुसार स्पष्ट झाले आहेत.
वेर्णा, जुने गोवा पोलीस हद्दीत सर्वाधिक अपघात
- वाहतूक पोलिसांच्या मासिक अपघात अहवालानुसार, राज्यात सर्वाधिक ७० अपघात वेर्णा आणि जुने गोवा पोलीस स्थानकाच्या हद्दीत झाले आहेत. त्याखालोखाल फोंडा ५८, पणजी ५३ आणि कुंकळ्ळी येथे ४९ अपघात नोंदवले गेले.
- या व्यतिरिक्त सर्वाधिक मृत्यूही ९ वेर्णा पोलीस स्थानकाच्या हद्दीत झाले आहेत. त्यानंतर हणजूण ७, वाळपई ६, तर जुने गोवा आणि काणकोण येथे प्रत्येकी ५ मृत्यू झाले आहेत.
दुचाकी, कार अपघातांचे हॉटस्पॉट
- दुचाकीचे सर्वाधिक ५६ अपघात जुने गोवा पोलीस हद्दीत झाले. त्यापाठोपाठ मायणा-कुडतरी ५१, फोंडा ४८, वेर्णा ४६ आणि डिचोलीत ३८, तर इतर ठिकाणी ३७५ दुचाकीचे अपघात झाले आहेत.
- कारचे सर्वाधिक ५८ अपघात पणजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाले. त्यानंतर वेर्णा ५३, कुंकळ्ळी ४१, जुने गोवा ४० आणि हणजूण येथे ३९ कार, तर इतर ठिकाणी ३४४ कार अपघात झाले आहेत.