वेळ्ळीचा वीज प्रश्न टांगणीला

Story: अंतरंग |
20th May, 10:47 pm
वेळ्ळीचा वीज प्रश्न टांगणीला

दक्षिण गोव्यातील इतर मतदारसंघांमध्ये आधुनिक भूमिगत वीज वाहिन्यांचे जाळे पसरत असताना वेळ्ळी मतदारसंघ मात्र आजही अनेक वर्षांपूर्वीच्या जुन्या पायाभूत सुविधा आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या छायेखाली आहे. कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला भूमिगत केबल प्रकल्प रखडल्याने येथील रहिवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

वेळ्ळीमधील भूमिगत केबल प्रकल्पाचा प्रस्ताव सर्वप्रथम २०१९ मध्ये मांडण्यात आला होता. तेव्हापासून आजपर्यंत अनेक मंत्र्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. या प्रकल्पासाठी अंदाजे ५१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, सध्या हा खर्चाचा अंदाज पुन्हा एकदा पुनरावलोकनासाठी पाठवण्यात आला आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे या प्रकल्पाचे भवितव्य टांगणीला लागले आहे. 

वेळ्ळीतील वीजपुरवठ्याचा मुख्य आधार असलेली धर्मापूर येथील ११ केव्ही फिडरवरील वीजवाहिनी सुमारे ३५ वर्षे जुनी असून, ही वाहिनी अनेक पाणथळ भागातून आणि क्रशर झोनमधून जात असल्याने तिची देखभाल करणे जिकिरीचे ठरते. खराब इन्सुलेटर आणि जुन्या तारांमुळे पावसाळ्यात किंवा वार्‍यामुळे झाडे पडल्यास वीजपुरवठा तासन् तास खंडित होतो.

चिंचणी आणि आसपासच्या भागात सलग तीन दिवस वीज नसल्याने संतापलेल्या नागरिकांनी रविवारी रात्री वीज खात्याच्या कार्यालयावर मोर्चा वळवला. इतकी गंभीर परिस्थिती असतानाही कार्यालयात माहिती देण्यासाठी कोणताही वरिष्ठ अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी आमदार क्रूझ सिल्वा यांना पाचारण केले. याचवेळी काहींनी आपला राग कार्यालयाच्या दारावर काढत ते फोडून टाकले. आमदारांनी मध्यरात्री घटनास्थळी धाव घेऊन वरिष्ठ अभियंत्यांशी संपर्क साधत तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या.

वीज खंडित झाल्यानंतर त्याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वीज खात्याकडे कोणतीही सक्षम यंत्रणा नसल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. वारंवार फोन करूनही कार्यालयातून प्रतिसाद मिळत नाही. किमान सोशल मीडियाच्या माध्यमातून तरी माहिती द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. वेळ्ळीतील हा वीज प्रश्न सुटण्यासाठी भूमिगत वीजवाहिन्यांचे काम तत्काळ हाती घेण्याची गरज आहे. आता केवळ आश्वासने नको, तर प्रत्यक्ष कृतीची गरज असल्याचे मत वेळ्ळीवासीयांकडून व्यक्त होत आहे.

अजय लाड