‘प्रभाकरन’ वादाचे नवे वादळ

Story: राज्यरंग |
22nd May, 12:15 am
‘प्रभाकरन’ वादाचे नवे वादळ

मुख्यमंत्री विजय यांच्या भूमिकेवरून भाजप आक्रमक तामिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री विजय यांनी बंदी घातलेल्या 'लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम' (एलटीटीई) या संघटनेचे संस्थापक व्ही. प्रभाकरन यांना श्रद्धांजली वाहिल्याने देशाच्या राजकारणात एक नवा वाद पेटला आहे. १८ मे रोजी 'मुलिवाइक्कल स्मरण दिना'चे औचित्य साधत मुख्यमंत्री विजय यांनी सोशल मीडिया 'एक्स'वर, "आम्ही मुलिवाइक्कलच्या आठवणी हृदयात जपून ठेवू आणि तमिळ बांधवांच्या हक्कांसाठी नेहमी उभे राहू," अशी पोस्ट लिहीत प्रभाकरन यांच्या आठवणींना उजाळा दिला. या विधानामुळे तामिळनाडूच्या राजकारणातील अंतर्गत समीकरणे आणि जुने वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

मुख्यमंत्री विजय यांच्या या भूमिकेनंतर भाजपचे मीडिया सेल प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मालवीय यांनी आठवण करून दिली की, १९९१ मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा मुख्य आरोपी प्रभाकरन होता आणि या हाय-प्रोफाइल हत्येमुळेच भारतात 'एलटीटीई'वर बंदी घालण्यात आली आहे. तामिळनाडूमध्ये काँग्रेस विजय यांच्या सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी आहे. त्यामुळे सत्तेच्या मोहापोटी राहुल गांधी आणि काँग्रेसला या श्रद्धांजलीची काहीच अडचण वाटत नाही, असा घणाघाती आरोप भाजपने केला आहे.

तामिळनाडूतील मुख्य प्रवाहातील पक्ष सहसा प्रभाकरनला उघडपणे पाठिंबा देणे टाळतात. मात्र, मुख्यमंत्री विजय यांनी निवडणूक प्रचारादरम्यानही प्रभाकरन यांचा उल्लेख 'आईसारखे प्रेम देणारा नेता' असा केला होता. विजय यांच्या सरकारला 'विदुथलाई चिरुथैगल काची' (व्हीसीके)चा पाठिंबा आहे, जो पक्ष पहिल्यापासूनच श्रीलंकेतील तमिळांविषयी सहानुभूती बाळगत आला आहे.

२००९ मध्ये श्रीलंकेच्या लष्करी कारवाईत प्रभाकरन मारला गेला आणि मुलिवाइक्कल येथील नरसंहाराने ३० वर्षांचे गृहयुद्ध संपले. जागतिक स्तरावर हा दिवस तमिळ नागरिकांच्या बलिदानाचा मानला जात असला, तरी भारतात 'राजीव गांधींचे मारेकरी' म्हणून एलटीटीईकडे पाहिले जाते. अशा परिस्थितीत, मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांनी घेतलेली ही भूमिका तामिळ अस्मितेचा मुद्दा ठरते की काँग्रेस-भाजपमधील नव्या संघर्षाचे कारण, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

- प्रदीप जोशी