
तंत्रज्ञानाच्या युगात आपण अनेक अशक्य गोष्टी शक्य होताना पाहिल्या आहेत, पण जर एखादा देश मानवांऐवजी पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे (एआय) चालवला गेला तर? ऐकायला हे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखे वाटत असले, तरी फिलिपाइन्सच्या एका छोट्या बेटावर हा अनोखा प्रयोग प्रत्यक्षात येत आहे. ब्रिटनचे तंत्रज्ञान उद्योजक डॅन थॉमसन यांनी पलावन द्वीपसमूहातील ३.६ चौरस किलोमीटरच्या एका बेटाला त्यांच्या ‘सेन्साय’ या एआय कंपनीच्या नावावरून 'मायक्रोनेशन' (स्वयंघोषित छोटे राष्ट्र) घोषित केले आहे.
या देशाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील मंत्रिमंडळ. या सरकारमध्ये निर्णय घेण्यासाठी १७ एआय बॉट्सची एक परिषद तयार करण्यात आली आहे. हे बॉट्स सामान्य नसून, जगातील महान नेते जसे की महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, विन्स्टन चर्चिल, एलेनॉर रूझवेल्ट आणि विचारवंत मार्कस ऑरेलियस यांच्या विचारांवर आणि लेखनावर आधारित असलेले 'डिजिटल अवतार' आहेत. हे अवतार आपापसात वादविवाद, युक्तिवाद आणि मतदान करून देशाचे धोरण ठरवतील. थॉमसन यांच्या दाव्यानुसार, हे एआय नेते वैयक्तिक लोभ, भ्रष्टाचार आणि राजकीय स्वार्थापासून पूर्णपणे मुक्त राहून केवळ वस्तुनिष्ठ निर्णय घेतील.
या व्यवस्थेत प्रत्यक्ष लोकसहभागही असेल. जगातील कोणताही व्यक्ती येथे 'ई-रेसिडंट' बनून आपले प्रस्ताव मांडू शकेल, ज्यावर ही एआय परिषद निर्णय घेईल. विशेष म्हणजे, सध्या या बेटावर केवळ एक केअरटेकर राहत असला, तरी तब्बल १२,००० लोकांनी या डिजिटल देशाचे ई-नागरिक बनण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. पारंपरिक राजकारणावरील अविश्वास आणि भ्रष्टाचाराला कंटाळलेले लोक या व्यवस्थेकडे आकर्षित होत आहेत. २०२७ पर्यंत येथे भौतिक निवासी सुविधाही सुरू करण्याची योजना आहे.
तथापि, एआयच्या स्वायत्ततेमुळे उद्भवू शकणाऱ्या धोक्यांची जाणीव ठेवून, कोणत्याही आपत्कालीन किंवा चुकीच्या निर्णयाच्या स्थितीत मानवी हस्तक्षेप करण्यासाठी 'ह्यूमन ओव्हरराइड असेंबली' देखील तयार करण्यात आली आहे.
या प्रयोगाला जगभरातून कौतुक मिळत असतानाच, तीव्र विरोधाचाही सामना करावा लागत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एआय तज्ज्ञ अलोंद्रा नेल्सन यांच्यासारख्या समीक्षकांच्या मते, दररोज नवनवीन चुका करणाऱ्या एआय यंत्रणेकडे सरकार चालवण्याची जबाबदारी देणे हास्यास्पद आणि अलोकतांत्रिक आहे. एका खासगी कंपनीने तयार केलेली व्यवस्था कधीही खऱ्या लोकशाहीची जागा घेऊ शकत नाही.
हा प्रयोग यशस्वी होईल की नाही, हे येणारा काळच ठरवेल. परंतु, भविष्यात जगातील पारंपरिक सरकारे देखील एआय-आधारित प्रणालींचा स्वीकार करू शकतात, या थॉमसन यांच्या विश्वासाला या प्रयोगाने नक्कीच एक नवीन दिशा दिली आहे.
- सुदेश दळवी