पेट्रोलच्या दरात २.६० रुपये तर डिझेलमध्ये २.७० रुपयांची वाढ

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि मध्यपूर्वेतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा मोठी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर सुमारे २.६० रुपये तर डिझेलमध्ये २.७० रुपयांची वाढ करण्यात आली. (Petrol and diesel have been hiked by Rs 2.6 and Rs 2.7 per litre) गेल्या दहा दिवसांत इंधन दरवाढीची ही चौथी फेरी असून या कालावधीत पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये जवळपास ८ रुपयांची वाढ झाली आहे.
दरवाढीनंतर राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०२.१२ रुपये तर डिझेलचा दर ९५.२० रुपयांवर पोहोचला आहे. मुंबई, कोलकाता, बेंगळुरू आणि चेन्नईसह अनेक महानगरांमध्ये पेट्रोलचे दर ११४ रुपयांच्या दिशेने झेपावत असून; सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.
मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने सरकारी तेल कंपन्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांना दररोज सुमारे १,६०० ते १,७०० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दहा आठवड्यांत हा तोटा एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाल्याचे सांगितले जात आहे.
दरवाढीमुळे वाहतूक, मालवाहतूक आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून; महागाईचा दबाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.