हणजूण येथे वीज खांब रस्त्यावर कलंडले; वीजपुरवठा खंडित

शनिवारी रात्रभर पडला पाऊस

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
हणजूण येथे वीज खांब रस्त्यावर कलंडले; वीजपुरवठा खंडित

पणजी : गोव्यात काल शनिवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी किरकोळ प्रमाणात पडझडीच्या घटनांची नोंद झाली आहे. दरम्यान हणजूण येथे विजेचे दोन खांब रस्त्यावर धोकादायक पद्धतीने वाकल्याची घटना घडली. पावसामुळे खांबाजवळील माती भुसभुशीत झाल्याने हे खांब झुकले, ज्यातील एक खांब पूर्णपणे रस्त्याच्या दिशेने वाकला आहे. मुख्य रस्त्यावरच हे घडल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या  वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आणि वाहतूक विस्कळीत झाली.




घटनेची माहिती मिळताच ट्रॅफिक पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच, वीज खात्याचे कर्मचारी क्रेनसह घटनास्थळी पोहोचले असून वाकलेले खांब बाजूला करून ते पुन्हा सरळ करण्याचे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या अपघातामुळे खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. 


 

आज सकाळच्या सत्रात गोव्यात सर्वत्र थोड्याफार प्रमाणात पडल्यानंतर पावसाने दुपारी विश्रांती घेतली. दुपारपर्यंत सर्वत्र दमट हवामान जाणवण्यास सुरुवात झाली. आज रविवार आणि उद्या सोमवारी गोव्यात बहुतांश भागात पावसाचा अंदाज अंदाज व्यक्त करताना वेधशाळेने 'यलो अलर्ट' जारी केला आहे. गेल्या २४ तासांत दाबोळी आणि मुरगाव येथे सुमारे २ इंच पावसाची नोंद झाली. संपूर्ण राज्यात पाऊस पडला असला, तरी दक्षिण गोव्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. गेल्या २४ तासांत राज्यात सरासरी २२.४ मिमी (सुमारे १ इंच) पावसाची नोंद झाली आहे. शनिवारपासून असलेले दमट हवामान रविवारीही कायम होते. गेल्या २४ तासांतील नोंदीनुसार, दाबोळी येथे ५२ मिमी (२ इंचांपेक्षा जास्त), मुरगाव येथे ४२ मिमी आणि मडगाव येथे ३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तापमान चढेच असले तरी पावसामुळे हवामानात गारवा निर्माण झाला आहे.

१ मार्च २०२६ नंतर आतापर्यंत केपे येथे सर्वाधिक ११६ मिमी (साडेचार इंच) पावसाची नोंद झाली आहे. यानंतर मडगाव, दाबोळी आणि सांगे येथे सर्वाधिक पाऊस पडला आहे.