बाणावलीत घराला आग; ३.५ लाखांची मालमत्ता जळून खाक

८ लाखांचे साहित्य वाचवण्यात अग्निशामक दलास यश; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
बाणावलीत घराला आग; ३.५ लाखांची मालमत्ता जळून खाक

मडगाव: बाणावली येथील वासवाडो परिसरातील एका निवासी घराला रविवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. या आगीत सुमारे ३.५ लाख रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले आहे. मात्र, मडगाव अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत पाण्याचा मारा केला आणि सुमारे ८ लाख रुपयांची मालमत्ता सुरक्षितरित्या वाचवली.



मडगाव अग्निशामक दलाला रविवारी सकाळी ७:०५ वाजता या आगीबाबतची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच जवानांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वासवाडो येथील फिलिम्पो रॉड्रिग्स यांच्या मालकीच्या घरात ही आग लागली होती. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की, घरातील दोन बेडरूम्स पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यामध्ये कपाटे, छताचे वासे, सोन्याचे दागिने, रोख रक्कम, सोफा सेट आणि बेड यांसारख्या मौल्यवान वस्तूंचे मोठे नुकसान झाले.



अग्निशामक दलाच्या पथकाने अथक प्रयत्नांनंतर सकाळी ९ वाजेपर्यंत आग पूर्णपणे विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली. जवानांमुळे घराचा उर्वरित भाग आणि त्यातील साहित्य वाचवण्यात यश आले व मोठा अनर्थ टळला. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे अचूक कारण अद्याप समजू शकलेले नाही; मात्र शॉर्ट सर्किटमुळेच आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा