शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता

पणजी : चिंबल येथील गवळीभाट परिसराजवळ एका बंद घराला आज रविवारी सकाळी ६.१५ च्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील बेडरूम, एसी, टीव्ही, फर्निचर आणि कपड्यांसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या असून, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १२ ते १५ लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे अचूक कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ६:५५ च्या सुमारास त्यांना या आगीची माहिती देणारा फोन आला. माहिती मिळताच मुख्य अग्निशामक केंद्रातून जवानांनी तात्काळ गाडी रवाना केली आणि अवघ्या काही मिनिटांतच पथक घटनास्थळी दाखल झाले. घर पूर्णपणे बंद असल्याने खिडक्यांमधून आणि छतावरून धुराचे प्रचंड लोट बाहेर पडत होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जवानांनी तात्काळ खिडक्यांच्या काचा फोडून वेंटिलेशन तयार केले आणि पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले.

काही वेळातच दुसरी गाडीही घटनास्थळी मागवण्यात आली. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले आणि ही आग शेजारील इतर घरांमध्ये पसरण्यापासून रोखली. वेळेत मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला असला, तरी घरातील मौल्यवान साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. पोलीस आणि अग्निशामक दल या घटनेचा पुढील तपास करत आहेत.