खांडेपार येथील शाळेची संरक्षक भिंत कोसळली : प्रशासनाचा ढिसाळ कारभार

पणजी : राज्यात शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागाला तडाखा बसला. खांडेपार येथील गोवा विद्या प्रसारक मंडळाच्या मातोश्री इंदिराबाई बाबूराव खांडेपारकर शाळेची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. सुदैवाने रात्रीच्या वेळी ही भिंत कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली अाहे. यामुळे शाळेच्या मैदानाचे आणि परिसराचे नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवले आहे. योग्य गटार व्यवस्था नसणे आणि पाण्याचा निचरा न होणे यामुळेच भिंत कमकुवत होऊन कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केला. मे महिना संपत आला तरी पंचायतीने कोणतीही मान्सूनपूर्व कामे वेळेत सुरू केली नसल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे नागरिक म्हणाले.
रस्त्यांच्या कडेला असलेल्या ड्रेनेजची साफसफाई न केल्यामुळे पाणी साचत आहे, तसेच अनेक वीज खांबही धोकादायक स्थितीत आले आहेत. पावसाळा पूर्णपणे सुरू होण्यापूर्वी सरकारने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ ड्रेनेज दुरुस्ती आणि सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

हणजूण येथे विजेचे खांब वाकले
हणजूण येथे मुसळधार पावसामुळे विजेचे दोन खांब धोकादायक पद्धतीने रस्त्याकडे वाकले. पावसामुळे खांबाजवळील माती भुसभुशीत झाल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. मुख्य रस्त्यावर खांब वाकल्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. तसेच वीज खात्याचे कर्मचारी क्रेनसह घटनास्थळी दाखल झाले असून वाकलेले खांब दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे.