रस्त्यावरील अतिक्रमण,'कॅरिंग कपेसिटी'च्या मुद्द्यावरुन मोरजी ग्रामसभा तापली

ग्रामस्थांचा स्मार्ट मीटरला पूर्ण विरोध; मुख्य जंक्शनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत ग्रामस्थ समाधानी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
3 hours ago
रस्त्यावरील अतिक्रमण,'कॅरिंग कपेसिटी'च्या मुद्द्यावरुन मोरजी ग्रामसभा तापली

पेडणे: मोरजी पंचायतीची ग्रामसभा सरपंच विलास मोर्जे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या गावात वाढत्या बांधकामांचा विषय चांगलाच गाजला. मोरजीची भूमी भविष्यात आणखी किती बांधकामे झेलू शकते, याचा तज्ज्ञांकडून गावाच्या वहन क्षमतेबाबत अहवाल घ्यावा, अशी मागणी जनार्दन शेटगावकर यांनी केली. तसेच, रस्त्यांच्या कडेला झालेली अतिक्रमणे आणि कोलमडलेल्या पार्किंग व्यवस्थेवर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावर, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमणांचा अहवाल तयार करून पुढील कारवाई केली जाईल, असे सरपंचांनी स्पष्ट केले.

गावात बसवण्यात येणाऱ्या 'स्मार्ट मीटर'ला ग्रामस्थांनी एकमुखाने पूर्ण विरोध केला. ज्या ठिकाणी हे मीटर बसवले आहेत तिथे वीज बिलात दुप्पट वाढ होत असल्याचा दावा नागरिकांनी केला. दरम्यान, पंचायतीने पुढाकार घेऊन गावातील मुख्य जंक्शनवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. याद्वारे 'नो पार्किंग झोन'मधील वाहनांवर कायदेशीर कारवाई करणे सोपे होणार आहे.

सभेत मंजूर ठरावांच्या संथ कार्यवाहीवर तुकाराम शेटगावकर यांनी प्रश्न उपस्थित केले, तर मयूर आणि सोनू शेटगावकर यांनी पार्किंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली. या सभेला उपसरपंच सुप्रिया गडेकर यांच्यासह सर्व पंच सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.