मुरगाव बंदरात इंधन आयात स्थिर : विनोदकुमार

खतांच्या कच्च्या मालात घट : खत उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th May, 11:29 pm
मुरगाव बंदरात इंधन आयात स्थिर : विनोदकुमार

पणजी : मुरगाव बंदरात इंधनाची आयात सध्या स्थिर असून कोणताही तुटवडा नसल्याची माहिती मुरगाव बंदर प्राधिकरणाचे (एमपीए) अध्यक्ष एन. विनोदकुमार यांनी दिली. मात्र, खत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीत गेल्या वर्षाच्या तुलनेत घट झाल्याने आगामी काळात खत उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील इंधन आयातीबाबत बोलताना विनोदकुमार यांनी सांगितले की, बंदरावर पेट्रोलियम उत्पादनांची आयात नियमित सुरू आहे. आमच्याकडे उपलब्ध माहितीनुसार, सध्या बंदरावर येणाऱ्या इंधन पुरवठ्यात कोणतीही कमतरता नाही. दर महिन्याला सरासरी दोन इंधन टँकर जहाजे बंदरात दाखल होतात आणि ही संख्या कायम आहे. राज्यात दरमहा सुमारे ०.१६ दशलक्ष टन तयार इंधन उपलब्ध होत असून त्यावर कोणताही परिणाम झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या गोव्यात झुवारी एग्रो कॅमिकल्स आणि पॅरादीप फोस्फेट्स या कंपन्या खत उत्पादन करून देशभर पुरवठा करतात. आता पावसाळी शेती हंगाम सुरू होणार असल्याने खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे खत उत्पादनावर परिणाम होऊन त्याचा थेट फटका शेती व्यवसायाला बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
इंधनाचा जपून वापर करण्याचे आवाहन
इंधन पुरवठा सुरळीत असला तरी नागरिकांनी इंधनाचा वापर संयमाने आणि जपून करावा, असे आवाहनही विनोदकुमार यांनी केले. इंधनाचा संतुलित वापर हा केवळ सध्याच्या परिस्थितीतच नव्हे, तर कायमस्वरूपी सवयीचा भाग व्हायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले. इंधन आयात स्थिर असली तरी खत उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या आयातीत मंदी आल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः अमोनिया आणि फॉस्फरिक अॅसिडच्या पुरवठ्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे.