केतन भाटीकर आमदार झाले नाहीत ही खंत कायम राहणार : ढवळीकर

‘रायझिंग फोंडा’तर्फे आयोजित शोकसभेत भाटीकर यांना श्रद्धांजली

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th May, 11:20 pm
केतन भाटीकर आमदार झाले नाहीत ही खंत कायम राहणार : ढवळीकर

केतन भाटीकर शोकसभेत आदरांजली अर्पण करताना वीजमंत्री सुदिन ढवळीकर.

फोंडा : केतन भाटीकर यांनी छोट्याशा कारकिर्दीत उत्तुंग कार्य करून आपला ठसा उमटला. समर्पित वृत्तीने त्याने केलेले कार्य सदैव कार्यकर्त्याच्या आठवणीत राहील. केतन भाटीकर विधानसभा निवडणूक जिंकून आमदार बनले नाही ही खंत मनात कायम राहणार असल्याचे उद्गार वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काढले.
फोंडा येथे रविवारी रायझिंग फोंडाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या केतन भाटीकर श्रद्धांजली सभेत वीजमंत्री सुदिन ढवळीकर बोलत होते. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते, समाज कार्यकर्ते व विविध संघटनाचे पदाधिकारी यावेळी सभागृहात उपस्थित होते.
यावेळी आमदार एल्टन डिकोस्टा म्हणाले, फोंडा मतदारसंघाचा कायापालट करण्याचे स्वप्न उराशी बाळगून भाटीकर अविरत काम करत होते, त्यांची कार्यपद्धती आगळीवेगळी होती. मगोचे प्रदेशाध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले, भाटीकरांनी स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता गोरगरिबांसाठी आरोग्याच्या क्षेत्रात मोठे काम केले, त्यांचे हे अपूर्ण स्वप्न आपण सर्वांनी मिळून पुढे नेले पाहिजे. काँग्रेस नेते राजेश वेरेकर यावेळी म्हणाले, आज अनेक संस्थांकडे रुग्णवाहिका सेवा आहे; मात्र भाटीकरांची रुग्णवाहिका सेवा आणि त्यांची सामाजिक ऊर्जा ही इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती.
या शोकसभेत नगरसेवक, सरपंच, समाज कार्यकर्ते, उद्योजक आदींनी श्रद्धांजलीपर भाषण केले. सूत्रसंचालन व प्रास्ताविक अजय बुवा यांनी केले.
भाटीकरांच्या निधनाने गोव्याची अपरिमित हानी : आलेमाव
श्रद्धांजली वाहताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, केतन भाटीकर यांच्या निधनामुळे कुटुंबातीलच एक सदस्य गमावल्यासारखे वाटत आहे. आगामी पोटनिवडणुकीत ते सहज विजयी झाले असते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यांना आमदारकी केवळ सत्ता उपभोगण्यासाठी नव्हे, तर लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी हवी होती. त्यांचा सामाजिक वारसा पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत.