मुख्यमंत्री, दामू नाईकांच्या दिल्ली भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
21 mins ago
मुख्यमंत्री, दामू नाईकांच्या दिल्ली भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांच्या दिल्ली भेटीमुळे मंत्रिमंडळ फेरबदल तसेच आगामी विधानसभा निवडणुकीबाबत राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष शनिवारीच दिल्लीला रवाना झाले असले, तरी रविवार दुपारपर्यंत त्यांच्या या गाठीभेटींबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

मात्र, दोघांच्याही अचानक झालेल्या दिल्ली भेटीमुळे मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे मंत्रिमंडळातील एक जागा रिक्त झाली आहे. फोंडा पोटनिवडणुकीनंतर ही जागा भरली जाईल, अशी अपेक्षा होती; मात्र उच्च न्यायालयाने फोंडा पोटनिवडणूक रद्द केल्याने मंत्रिमंडळातील एका जागेसह फोंड्याचे आमदारपदही रिक्त राहिले आहे.

मंत्रिमंडळातील ही रिक्त जागा कधी भरली जाणार आणि मंत्रिपदावर कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता या दिल्ली भेटीमुळे अधिक वाढली आहे. सध्याच्या मंत्रिमंडळात एकाही महिला आमदाराला मंत्रिपद देण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर, आमदार दिलायला लोबो यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा रंगली आहे.