आतापर्यंत ८६७ संशयित रुग्ण; २०४ मृत्यूंची नोंद

नवी दिल्ली: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इबोला विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला ‘पब्लिक हेल्थ इमर्जन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न’ (PHEIC) घोषित केल्यानंतर भारत सरकारनेही खबरदारीची पावले उचलली आहेत. काँगो लोकशाही प्रजासत्ताक (DRC), युगांडा आणि दक्षिण सुदान या तीन आफ्रिकी देशांसाठी भारताने प्रवास सल्ला (Travel Advisory) जारी करत नागरिकांना अत्यावश्यक नसलेला प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केले की, इबोलाच्या ‘बुंडीबुग्यो’ प्रकाराशी संबंधित एकही रुग्ण भारतात आढळलेला नाही. मात्र, संभाव्य धोका लक्षात घेता विमानतळांसह विविध प्रवेशबिंदूंवर आरोग्य तपासणी आणि देखरेख अधिक कडक करण्यात आली आहे.
८६७ संशयित रुग्ण; २०४ मृत्यूंची नोंद
डब्ल्यूएचओने (WHO) आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांअंतर्गत ही आणीबाणी घोषित केली आहे. काँगो आणि युगांडामध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढत असून; सीमावर्ती हालचालींमुळे दक्षिण सुदानलाही उच्च धोका निर्माण झाला आहे. आतापर्यंत या उद्रेकात ८६७ संशयित रुग्ण आणि २०४ मृत्यूंची नोंद झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सध्या पसरत असलेला ‘बुंडीबुग्यो’ प्रकार अधिक चिंताजनक मानला जात आहे, कारण या प्रकारासाठी अद्याप कोणतीही अधिकृत लस किंवा विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. त्यामुळे रोगाचा प्रसार रोखण्यासाठी लवकर निदान, विलगीकरण आणि कठोर आरोग्य देखरेख यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
इबोला हा अत्यंत गंभीर विषाणूजन्य आजार असून; ताप, अशक्तपणा, अंगदुखी, उलट्या तसेच अंतर्गत किंवा बाह्य रक्तस्राव अशी लक्षणे दिसू शकतात. संक्रमित व्यक्तीच्या शारीरिक द्रवांच्या थेट संपर्कातून हा विषाणू पसरतो.
प्रभावित देशांमधील भारतीय नागरिकांनी नियम पाळावेत
भारतीय नागरिकांना प्रभावित देशांमध्ये वास्तव्य करताना स्थानिक आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आणि अतिरिक्त दक्षता घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
