नाव अजब असले, तरी तरुणाई पाठीशी; सरकारला दिला मोठा सल्ला

पुणे : युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती असते. तरुणांच्या भावना आणि लोकमत याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शासनाने त्यांच्या मतांचा अव्हेर न करता त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.
देशभरात सध्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’वरून दोन गट पडल्याचे चित्र असून, सोशल मीडियावर दावे-प्रतिदावे आणि आरोप-प्रत्यारोपांची जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तरुणांच्या भूमिकेला महत्त्व देत पाठिंबा व्यक्त केला आहे.
आता तब्बल काही वर्षांनंतर पुन्हा एकदा युवकांमध्ये असंतोषाची लाट उसळताना दिसत आहे. बेरोजगारी, पेपरफुटी, महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर सोशल मीडियातून सुरू झालेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या व्यंगात्मक ऑनलाइन आंदोलनाची देशभर चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, या आंदोलनाला आता अण्णा हजारेंनीही अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
पत्रकारांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’बाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, झुरळ असे नाव असले तरी देशातील मोठ्या प्रमाणात तरुण त्या पक्षाच्या पाठीशी उभे राहत आहेत. मग त्या नावामागचा उद्देश काय आहे, हे समजून घेतले पाहिजे. नाव योग्य वाटत नसेल, तरी युवकांचा पाठिंबा ही मोठी बाब आहे. युवा शक्ती ही राष्ट्र शक्ती असते. तरुणांच्या भावना आणि लोकमत याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शासनाने त्यांच्या मतांचा अव्हेर न करता त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची मोठी चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स मिळवत देशातील तरुण पिढीला भुरळ घालणाऱ्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांची देखील चर्चा सुरू आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका सुनावणीदरम्यान बेरोजगार तरुणांबाबत केलेल्या एका वक्तव्यानंतर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ ही व्यंगात्मक राजकीय चळवळ जन्माला आली.
पक्षाचे इन्स्टाग्राम खाते पुन्हा सुरू
पक्षाचे संस्थापक अभिजित दीपकी यांनी एक्सवरील पोस्टद्वारे पक्षाचे इन्स्टाग्राम खाते पुन्हा सुरू झाल्याची माहिती दिली. आम्ही इन्स्टाग्रामवर परत आलो आहोत. आमचे खाते परत मिळाले आहे, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच ‘सीजेपी’चे अधिकृत एक्स खाते भारतात ब्लॉक करण्यात आले होते. त्यानंतर सोशल मीडियावर या पक्षाबाबत मोठी चर्चा रंगली होती.