
वॉशिंग्टन: जगातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष भवन 'व्हाईट हाऊस'बाहेर शनिवार संध्याकाळी अचानक झालेल्या गोळीबाराने प्रचंड खळबळ उडाली. सुरक्षा चौकीवर तैनात असलेल्या सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांवर एका २१ वर्षीय तरुणाने अंधाधुंध गोळीबार केला. मात्र, अत्यंत सतर्क असलेल्या जवानांनी तात्काळ प्रत्युत्तरादाखल कारवाई करत अवघ्या काही मिनिटांतच हल्लाखोराला जागीच ढेर केले. या गोळीबाराच्या वेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्येच उपस्थित होते, मात्र ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. या चकमकीत तिथून जाणाऱ्या एका निष्पाप नागरिकाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या हल्लाखोराचे नाव 'नासिरे बेस्ट' (वय २१) असे आहे. नासिरे कोणताही व्यावसायिक शूटर किंवा दहशतवादी नव्हता, तर तो मानसिकदृष्ट्या आजारी होता. त्याला स्वतःबद्दल एक विचित्र भ्रम होता, तो स्वतःला 'जीसस क्राइस्ट' म्हणजेच ईसा मसीह समजत असे. विशेष म्हणजे, यापूर्वीही त्याने व्हाईट हाऊसच्या परिसरात सुरक्षा नियम तोडल्याप्रकरणी अटक झाली होती. कोर्टाने त्याला व्हाईट हाऊसच्या परिसरात येण्यास बंदी घातली होती.

ही घटना शनिवार संध्याकाळी ठीक ६ वाजता १७व्या स्ट्रीट आणि पेन्सिल्वेनिया अव्हेन्यू परिसरात घडली. नासिरे बेस्टने पाठीवरील बॅगेतून अचानक बंदूक काढली आणि जवानांवर थेट गोळीबार सुरू केला. या आकस्मिक हल्ल्यानंतर सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी तात्काळ पोझिशन घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी सुमारे १५ ते ३० गोळ्या झाडल्या गेल्या. जवानांच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या नासिरेला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेच्या वेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ओवल ऑफिसमध्ये एका महत्त्वपूर्ण करारावर काम करत होते. गोळीबाराच्या आवाजानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून व्हाईट हाऊसमध्ये तात्काळ लॉकडाऊन लागू करण्यात आला. गोळीबाराचा आवाज एवढा भयानक होता की, तिथल्या नॉर्थ लॉन आणि मीडिया टेंटमध्ये उपस्थित असलेल्या पत्रकारांमध्ये घबराट पसरली. एबीसी न्यूजच्या प्रतिनिधी सेलिना वँग यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पत्रकार स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आडोसा शोधताना दिसत आहेत. जवानांनी पत्रकारांना तातडीने सुरक्षित प्रेस ब्रीफिंग रूममध्ये हलवले. सुमारे एक तासानंतर संध्याकाळी ७ वाजता हा लॉकडाऊन हटवण्यात आला.
महिन्याभरापूर्वीच 'व्हाईट हाऊस करस्पाँडंट्स डिनर'दरम्यानही एका बंदूकधाऱ्याने गोळीबार केल्याची घटना घडली होती. या ताज्या घटनेमुळे अमेरिकेच्या हाय-सिक्योरिटी झोनमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, एफबीआय आणि स्थानिक पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.