गोवा फॉरवर्डतर्फे राज्यव्यापी सदस्य नोंदणी मोहीम सुरु

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
just now
गोवा फॉरवर्डतर्फे राज्यव्यापी सदस्य नोंदणी मोहीम सुरु

मडगाव : गोव्यात सध्या जी परिस्थिती आहे, ती बदलायची असल्यास 'गोवा फॉरवर्ड' हाच एकमेव पर्याय आहे. बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, जमिनींचे संरक्षण आणि इतर ज्वलंत समस्यांविरुद्ध एकजूट होऊन बदल घडवण्याची हीच खरी वेळ आहे, असे प्रतिपादन गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी केले. पक्षाच्या राज्यव्यापी सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

आमदार सरदेसाई यांनी पुढे सांगितले की, राज्यातील युवकांना नोकऱ्या उपलब्ध नाहीत. ज्या काही नोकऱ्या आहेत, त्यासाठी पैशांची मागणी केली जाते; ज्यामुळे बेरोजगारीत गोवा देशात आघाडीवर आहे. स्थानिकांनी एखादा धंदा किंवा व्यवसाय करण्याचा प्रयत्न केल्यास, परवानग्या मिळवण्यासाठी त्यांना वारंवार सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. राज्यात गुन्हेगारी सातत्याने वाढत असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कोळसा वाहतूक, लोकांच्या जमिनी हडप करणे आणि रेल्वे दुपदरीकरण यांसारखे वादग्रस्त प्रश्न प्रलंबित असून, राज्याबाहेरील लोकांना सर्रास जमिनी विकल्या जात आहेत. सत्तेसाठी धार्मिक सलोखा आणि एकजूट बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही विदारक परिस्थिती बदलायची असल्यास गोवा फॉरवर्ड पक्ष हाच सक्षम पर्याय असल्याचे ते म्हणाले.

गोवा फॉरवर्ड हा केवळ एक राजकीय पक्ष नसून, ज्यांना 'गोंयकारपण' टिकवून ठेवायचे आहे, त्यांच्यासाठी ती एक चळवळ आहे असे सरदेसाई म्हणाले. या मोहिमेद्वारे विजय सरदेसाई यांनी विशेषतः गोव्यातील तरुण पिढीला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. आपण नेहमीच युवाशक्तीवर विश्वास ठेवला असून, युवकांनी गोव्याचे भविष्य आता स्वतःच्या हातात घेण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. 'गोवा प्रथम' या ब्रीदवाक्यासह ही मोहीम राबवली जात असून, पक्षाकडून अधिकृत नोंदणी लिंक जाहीर करण्यात आली आहे. गोव्याच्या हितासाठी नागरिकांनी या चळवळीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सरदेसाई यांनी शेवटी केले.

हेही वाचा